Join us

आर्थिक मंदीचा सरकारच्या तिजोरीलाही फटका, वित्तीय तूट वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 7:07 PM

देशातील आर्थिक जगतात आलेल्या सुस्तीचे परिणाम आता दिसू लागले असून, या आर्थिक सुस्तीचा फटका आता सरकारच्या तिजोरीलाही बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नवी दिल्ली - देशातील आर्थिक जगतात आलेल्या सुस्तीचे परिणाम आता दिसू लागले असून, या आर्थिक सुस्तीचा फटका आता सरकारच्या तिजोरीलाही बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध आर्थिक मुद्द्यांवर सल्ला देणारी कंपनी फिच सॉल्युशन्सने भारताच्या वित्तीय तुटीबाबतचे आपले अनुमान वाढवले आहे. २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात भारताची एकूण वित्तीय तूट ही सकल घरेलू उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.६ टक्के राहील, असा अंदाज फिच सॉल्युशन्सने वर्तवला आहे. यापूर्वी याच कंपनीने भारताची वित्तीय तूट ३.४ टक्के राहील, असे म्हटले होते. मात्र आता आपल्या अंदाजात ०.२ टक्क्यांनी वाढ करत तो ३.६ पर्यंत नेला आहे.  यावर्षी जुलै महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित राखण्याचे निश्चित केले होते. मात्र ही वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवर असलेली सुस्ती आणि जीएसटीच्या माध्यमातून येणाऱ्या महसुलात झालेली घट, तसेच कॉर्पोरेट टॅक्समध्ये केलेल्या कपातीमुळे सरकारी तिजोरीत जमा होणारा महसूल घटण्याचा अंदाज फिच सॉल्युशनने वर्तवला आहे.  आर्थिक मंदीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशांतर्गत कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे २०१९ ते २० या काळात सरकारला सुमारे १ लाख ४५ हजार कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, जीएसटीच्या माध्यमातून येणारे उत्पन्नही घटले आहे. तसेच सरकारच्या अंदाजापेक्षाही हे उत्पन्न खाली गेले आहे. त्याबरोबरच सरकारच्या महसुलात होणाऱ्या वाढीबाबतच्या आकड्याचा अंदाजही फिचने बदलला आहे. या आर्थिक वर्षात सरकारच्या महसुलात १३.१ ऐवजी ८.३ टक्के एवढीच वाढ होईल, असा सुधारित अंदाज फिचने व्यक्त केला आहे. हा आकडा सरकारने व्यक्त केलेल्या १३.२ टक्के अंदाजापेक्षा फार कमी आहे.  

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतसरकार