मुंबई: ऑटो मोबाईल क्षेत्रातील आर्थिक मरगळ कायम आहे. मारुती सुझुकी इंडियानं सप्टेंबरमध्ये उत्पादन १७.४८ टक्क्यांनी कमी केलं आहे. कार निर्मिती क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुतीकडून सलग आठव्या महिन्यात उत्पादनात कपात करण्यात आली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये मारुतीनं १,६०,२१९ गाड्यांचं उत्पादन केलं होतं. यंदाच्या सप्टेंबरमध्ये हाच आकडा १,३२,१९९ वर आला आहे.
मारुतीच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या उत्पादनात १७.३७ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मारुतीनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या १,५७,६५९ वाहनांचं उत्पादन केलं होतं. यंदा मागणीच नसल्यानं कंपनीनं १,३०,२६४ वाहनांची निर्मिती केली. मिनी आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मोडणाऱ्या अल्टो, न्यू वॅगनआर, सेलेरिया, इग्निस, स्विफ्ट, बलेनो आणि डिझायरचं उत्पादन मारुतीनं १४.९१ टक्क्यांनी कमी केलं आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये कंपनीनं या मॉडेलच्या १,१५,५७६ गाड्या तयार केल्या होत्या. यंदाच्या सप्टेंबरमध्ये हाच आकडा ९८,३३७ वर आला आहे.
विटारा ब्रेझा, अर्टिगा, एस-क्रॉस या युटिलिटी व्हिईकल्सचं उत्पादन १७.०५ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मारुतीनं या मॉडेलच्या २२,२२६ गाड्यांची निर्मिती केली होती. यंदा हाच आकडा १८,४३५ वर आला आहे. मारुतीनं सियाझ या सेदान सेगमेंटमध्ये मोडल्या जाणाऱ्या मॉडेलचे ४,७३९ युनिट्स तयार केले होते. यावर्षी हा आकडा २,३५० वर आला आहे.
ऑटो क्षेत्रातील मंदी कायम; मारुतीकडून सलग आठव्या महिन्यात उत्पादन कपात
मागणीच कमी असल्यानं उत्पादनात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 08:39 AM2019-10-09T08:39:43+5:302019-10-09T08:43:39+5:30