अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2022 सादर केला. या अहवालानुसार, जागतिक सेमीकंडक्टर चिप्सच्या कमतरतेमुळे, ऑटोमोबाईल कंपन्यांचे उत्पादन कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 7 लाख नवीन वाहनांच्या ऑर्डर प्रलंबित असल्याचंही यामध्ये दिसून आलंय.
सेमीकंडक्टर चिप पुरवठ्यातील विलंबामुळे, 2021 मधील डेट ऑफ ऑर्डर आणि गाडी मिळणं यातील अंतर जागतिक स्तरावर सुमारे 14 आठवड्यांचे आहे. अहवालानुसार, चिप्सच्या कमतरतेमुळे अनेक क्षेत्रातील कंपन्यांचे उत्पादन एकतर पूर्णपणे ठप्प झाले आहे किंवा कमी झाले आहे.
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रावरही परिणाम
आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021-22 मध्ये, असे सांगण्यात आले की भारताने ऑटोमोबाईल क्षेत्रातही अशाच समस्यांचा सामना केला आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या आकडेवारीनुसार, कार उत्पादक कंपन्यांनी डिसेंबर 2021 मध्ये देशांतर्गत बाजारात 2,19,421 वाहनांची विक्री केली, जी तुलनेत 13 टक्क्यांनी घसरली आहे. "ही मागणीची समस्या नसून पुरवठ्याची समस्या आहे. विविध कार उत्पादक कंपन्यांच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येते की डिसेंबर 2021 पर्यंत 7 लाखांहून अधिक ऑर्डर प्रलंबित होत्या," असेही अहवालात म्हटले आहे.
कुठे होतो सेमिकंडक्टर चिपचा वापर?
सध्या जग चिपच्या तुटवड्यातून जात आहे, त्यामुळे 169 उद्योगांची दुरवस्था झाली आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर हे संकट निर्माण झाले आहे. या चिप कार, मोबाईल, लॅपटॉप, डेटा सेंटर्स, टॅबटसह अनेक उपकरणांमध्ये वापरल्या जातात. या आपत्तीचे संधीत रूपांतर करण्यासाठी भारत सरकारने सेमीकंडक्टर चिपच्या निर्मितीवर मोठा निर्णय घेतला आहे.
लॅपटॉप, स्मार्टफोन, मशीन शिवाय सर्व काम अपूर्ण आहे. अशा स्थितीत ही गॅजेट्स आणि मशीन्स बहुतांश लोकांकडे असतात. कम्प्युटर असो, लॅपटॉप असो, स्मार्ट कार असो, वॉशिंग मशीन असो, एटीएम असो, हॉस्पिटल मशिन असो, हातात स्मार्टफोन असो, या सर्वांमध्येच सेमीकंडक्टरची खूप गरज आहे.