नवी दिल्ली : दीर्घ प्रतीक्षेनंतर कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे यंदा वाहन उद्योगास अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. यंदा कारची विक्रमी विक्री होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनाही सूट अथवा सवलतीच्या स्वरूपात लाभ मिळू शकतो. कोरोना साथीमुळे मागील तीन वर्षांपासून वाहन उद्योगास संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. गेल्या महिन्यात स्टील, ॲल्युमिनियम, तांबे आणि पॅलेडियम यांच्या किमती १० ते २० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. कारचे ७० टक्के भाग याच धातूंपासून बनतात. किमती घटल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यात वाढ होईल. मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, यंदा प्रवासी कारची ऐतिहासिक विक्री होईल. २०१७-१८ चा ३२.८ लाख कार विक्रीचा उच्चांक मोडला जाईल. यंदा ३३.५ लाख ते ३५.५ लाख कारची विक्री होऊ शकते. कारच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. कोरोना आणि वाढत्या इंधन किमतीमुळे यापूर्वी ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती.
येणार पुन्हा चांगले दिवस...-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ संजीव गर्ग यांनी सांगितले की, पुरवठा व चिप संकट हळूहळू संपत आहे. किमती कमी होण्याची शक्यता नसली तरी सूट व सवलतीच्या स्वरूपात ग्राहकांना लाभ मिळू शकतो. आता सेमिकंडक्टरची टंचाईही दूर झाली आहे. - उत्पादनात कोणतीही समस्या राहिलेली नाही. त्यातच देशात कारचा अनुशेष सहा लाखांपेक्षाही अधिक आहे. त्यात ५० टक्के वाटा एकट्या मारुती सुझुकीचा आहे. त्यामुळे कारच्या मागणीत कोणतीही समस्या नाही. - पेट्रोल-डिझेलच्या किमती घटल्यामुळे ग्राहकांची धारणाही सुधारली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून वाहन उद्योगास चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.
कंपन्यांकडे कार ॲार्डरचा बॅकलॉग मारुती सुझुकी३,१५,०००ह्युंदाई इंडिया१,३५,०००महिंद्रा१,१५,०००टाटा मोटर्स५०,०००