लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ‘व्ही‘ आकारात वृद्धी पावण्याचे संकेत मिळत आहेत, असे औद्योगिक व व्यावसायिक संघटना ‘असोचेम’ने म्हटले आहे. असोचेमने म्हटले की, ग्राहकांचा आत्मविश्वास परतत आहे, वित्तीय बाजार जोमात आहे, वस्तू उत्पादनात वाढ होत आहे आणि निर्यातदार उत्साहात आहेत. ही सर्व लक्षणे २०२१ मध्ये ‘व्ही’ आकारातील वृद्धीच्या दिशेने संकेत करीत आहेत. कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे अत्यंत चांगले आर्थिक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.
असोचेमचे सरचिटणीस दीपक सूद यांनी सांगितले की, उच्च डाटा ‘व्ही’ आकारातील वृद्धीच्या दिशेने संकेत करीत आहेत. २०२० मधील शेवटच्या दोन महिन्यांतच याचे बीजांकुर दिसून येत होते. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-१९ साथीने २०२०-२१ या वित्त वर्षात वस्तू उत्पादन आणि सेवाक्षेत्राला जबर फटका दिला आहे. त्यामुळे भारताचा जीडीपी वृद्धीदर ७.७ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. सूद यांनी सांगितले की, भारत आपल्या दोन लसींसह लसीकरण मोहीम हाती घेणार आहे.