Engineering Exports : एककाळ असा होता की भारताला अनेक गोष्टींसाठी जगावर अवलंबून राहावं लागतं होतं. मात्र, गेल्या काही वर्षात देशाने झपाट्याने प्रगती केली आहे. अनेक क्षेत्रात भारताने आपली जगभर छाप सोडली आहे. आयटी सारख्या क्षेत्रात तर अमेरिका सारखा महासत्ता देशही भारतावर अवलंबून आहे. यात आता आणखी भर पडली आहे. कारण, भारत जगाला एकदोन नाही तर तब्बल २५० अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात करणार आहे. यामध्ये विविध वस्तूंचा समावेश असून याची यादी समोर आली आहे. केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी ही माहिती दिली.
सरकारच्या १ ट्रिलियन डॉलरच्या निर्यात लक्ष्यात अभियांत्रिकी क्षेत्रातील २५० अब्ज डॉलर्सचा समावेश आहे. सरकारने २०३० पर्यंत देशातून एक ट्रिलियन डॉलर्सची निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बर्थवाल म्हणाले, की “भारत चामडे, कापड आणि पारंपारिक क्षेत्रांसाठी ओळखला जातो. परंतु, देशातील अभियांत्रिकी क्षेत्र ज्यामध्ये वाहने, उपकरणे इ. एकूण निर्यातीपैकी २५ टक्के वाटा आहे. देशाने एक ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचं लक्ष्य ठेवलं आहे. या अनुषंगाने अभियांत्रिकी उद्योगातून २५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीची अपेक्षा करत आहोत.
बर्थवाल हे बांधकाम उपकरण उत्पादकांच्या परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, “आमची महत्त्वाकांक्षा जमिनीवरील वास्तवावर आधारित आहे. सरकार देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे, बंदरे, विमानतळांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे, रेल्वेच्या आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे, रस्ते रुंदीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे.
‘देशातील तरुण नवनवीन कल्पनांच्या शोधात आहेत’सचिव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टबद्दल बोलले आहे, ज्याचा उद्देश लास्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे. ते म्हणाले की ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन असलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची मागणी केली जाईल. “यामुळे अनेक संधी निर्माण होतील. भारतातील तरुण काही नवीन कल्पना शोधत आहेत, ज्यावर ते पेटंट घेऊन व्यावसायिक उत्पादन सुरू करू शकतील.”
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो-२०२५’ या वाहन प्रदर्शनात अनेक तरुणांशी संवाद साधला, जे चार्जिंग यंत्रणा कार्यक्षम बनवण्याच्या क्षेत्रात संधी शोधत आहेत. वाहतूक उद्योगाने प्रवास सुलभ करण्याबरोबरच सुरक्षित प्रवास करण्यावरही भर दिला पाहिजे यावर वाणिज्य सचिवांनी भर दिला. ते म्हणाले की, वाहतूक उद्योगाला भेडसावणाऱ्या काही समस्यांवर वाणिज्य मंत्रालय काम करत आहे.