Nokia Supply Chain Shift : भारताला कायम पाण्यात पाहणाऱ्या चीनची आता चांगलीच जिरणार आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच अॅपल कंपनीने आपलं आयफोनचं उत्पादन युनिट चीनधून भारतात स्थापित केलं आहे. आता यात आणखी एका मोठ्या ब्रँडची भर पडणार आहे. नोकिया ब्रँड अंतर्गत फोन बनवणारी फिनिश कंपनी एचएमडीने आता आपल्या उत्पादनाचा मोठा भाग चीनमधून भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यासोबतच HMD जगभरातील आपल्या पुरवठादारांना भारतात कारखाने सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, एचएमडी इंडिया आणि एशिया-पॅसिफिकचे सीईओ रवी कुंवर म्हणाले, “आम्ही चीनमधून जे काही निर्यात करायचो ते वेगाने कमी होत आहे. आता भारतातून निर्यात वाढत आहे. आम्ही आमची पुरवठा साखळी, सोर्सिंग आणि लॉजिस्टिक हब चीनमधून भारतात हलवण्यास सुरुवात केली आहे. "आमच्या मजबूत निर्यात धोरणाला पाठिंबा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे."
नोकिया आधीपासूनच भारतात
भारतात उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीने डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि झेट टाउन इंडियासोबत भागीदारी केली आहे. HMD चे अनेक स्मार्टफोन आणि फीचर फोन्सची भारतात आधीपासून निर्मित होत आहे. जे पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत निर्यात केले जातात. कंपनीचे म्हणणे आहे की भारताला स्पर्धात्मक आणि विश्वासार्ह उत्पादन केंद्र बनवण्यासाठी खर्च, गुणवत्ता आणि वेळेवर वितरण यासारख्या बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र, चीनमधून पूर्णपणे स्थानंतर होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचेही एचएमडीने सांगितले.
सरकारने स्पष्ट धोरण आखावे
HMD ने सरकारकडे स्पष्ट धोरणाची मागणी केली आहे, ज्यामुळे भारतातील स्थानिक घटक उत्पादनाला चालना मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय (MeitY) ४०,००० कोटी रुपयांच्या योजनेवर काम करत आहे, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीला चालना मिळेल. एचएमडीने अलीकडेच फ्यूजन स्मार्टफोन लॉन्च केला, जो गेमिंग आणि फोटोग्राफीसाठी अटॅच करण्यायोग्य ॲक्सेसरीजसह येतो. कंपनीचे लक्ष १०,००० ते १५,००० रुपयांच्या स्मार्टफोन सेगमेंटवर आहे. एचएमडीचे म्हणणे आहे की बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे आणि पुरवठा साखळी सुरक्षेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात वाढवण्यावरही लक्ष केंद्रित केले जाईल.