सरकार नियुक्त समितीने घेतला एकमताने निर्णय
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो दरात 0.२५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्याबरोबर रेपो दर आता सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.
धोरणात्मक व्याज दरात कपात करण्याचा निर्णय एमपीसीने एकमताने घेतला. समितीच्या सर्व सहा सदस्यांनी कपातीच्या बाजूने कौल दिला. या कपातीनंतर रेपो दर आता ६.२५ टक्के झाला आहे. रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्के झाला आहे. रेपो दरातील हा गेल्या सहा वर्षांतील नीचांक आहे. व्यावसायिक बँका रिझर्व्ह बँकेकडून तातडीचे कर्ज घेतात. त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याज दरास ‘रेपो दर’ म्हटले जाते. रेपो दरातील कपातीमुळे बँकांचा भांडवली खर्च कमी होईल. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांसाठी दिली जाणारी कर्जे स्वस्त होतील.
गेल्या सहा महिन्यांच्या काळात रेपो दरातील ही पहिली कपात आहे. उद्योग आणि व्यावसायिक जगताकडून दर कपातीची मागणी सातत्याने होत होती. रघुराम राजन हे गव्हर्नरपदावरून पायउतार झाल्यानंतर दर कपातीची शक्यता वाढली होती. व्याज दर चढे ठेवून राजन यांनी वृद्धीचा गळा घोटल्याचा आरोप अनेक वेळा करण्यात आला होता.
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, सध्या महागाईचा दर नरमाई दर्शवित असल्यामुळे त्याला अनुरूप असा निर्णय एमपीसीने घेतला आहे. महागाईचा दर ४ टक्क्यांवर (२ टक्के अधिक-उणे फेरफारासह) नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय योग्य आहे. खाजगी गुंतवणूक धिमी पडणे आणि भू-राजकीय संकट पाहता आगामी आर्थिक वर्षात वृद्धीबाबत जोखमीची स्थिती निर्माण होऊ शकते. (प्रतिनिधी)
महागाईचा दर अधिक उणे फेरफारासह २ ते ६ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याबाबत आम्हाला आशा आहे. २0१६-१७साठीच्या आर्थिक दृश्यात सुधारणा झाली आहे. तरीही महागाई ४ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर निगराणी करावी लागणार आहे. मागणी वाढल्यामुळे वास्तविक सकल मूल्य वर्धन वृद्धी (जीव्हीए) मजबूत झाली आहे. त्याचवेळी खाजगी गुंतवणूक कमजोर झाल्यामुळे वैश्विक मागणी पुढील वर्षी कमजोर होऊ शकते. चालू आर्थिक वर्षात जीव्हीए वृद्धी ७.६ टक्के, तर पुढील वर्षात ७.९ टक्के राहू शकते.
भारताचा वृद्धी दर मजबूत राहणार : जागतिक बँक
वॉशिंगटन : दक्षिण आशिया हे जागतिक पातळीवरील आर्थिक वृद्धीचे केंद्र असून, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धी दर २0१६मध्ये ७.६ टक्के आणि २0१७मध्ये ७.७ टक्के राहील, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेने काल ‘दक्षिण आशिया आर्थिक फोकस’ या नावाचा एक अहवाल जारी केला. हा अहवाल आगामी दोन वर्षांसाठी आहे. त्यात बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत विश्वास व्यक्त केला आहे. अहवाल म्हणतो की, कृषी क्षेत्रातील तेजीची अपेक्षा, वेतनवाढीमुळे मागणीत होऊ शकणारी वाढ, निर्यातीमुळे मिळणारे सकारात्मक योगदान आणि वैयक्तिक गुंतवणुकीतील सुधारणा यामुळे जीडीपीचा वृद्धी दर २0१६मध्ये ७.६ टक्के आणि २0१७मध्ये ७.७ टक्के राहील. भारतासमोर वृद्धीबरोबरच गरिबी कमी करणे, समावेशक विकासाला प्रोत्साहन देणे, आरोग्य, पोषण, शिक्षण आणि महिला व पुरुषांतील असमानता दूर करणे यांसारखी आव्हाने आहेत.
जागतिक बँकेने म्हटले की, दक्षिण आशिया सध्या जागतिक वृद्धीच्या दृष्टीने प्रमुख केंद्र बनले आहे. चीनमध्ये सध्या मंदी आहे. विकसित देशांत प्रोत्साहन धोरणांबाबत अनिश्चितता आहे. निधी प्रेषणाची गती धिमी झाली आहे. अशा परिस्थितीतही दक्षिण आशियाने आपला वृद्धी दर कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. देशांतर्गत पातळीवर काही आव्हाने आहेत. धोरणांतील अनिश्चिततेबरोबर महसुली तथा वित्तीय स्थिती नाजूक असणे या काही गोष्टी त्यात आहेत. तथापि, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पाकिस्तानबाबत जागतिक बँकेने म्हटले की, पाकिस्तानात मध्यम अवधीच्या आर्थिक हालचाली हळूहळू गतिमान होण्याचा अंदाज आहे. पाकचा जीडीपी वृद्धी दर २0१७मध्ये ५.0 टक्के, तर २0१८मध्ये ५.४ टक्के राहील. २0१६मध्ये साधन खर्चावर तो ४.७ टक्के तर बाजार मूल्यावर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
सोने महागले, चांदी उतरली
नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात मंगळवारी सोने ५0 रुपयांनी वाढून ३१,२५0 रुपये प्र्रति १0 ग्रॅम झाले. चांदी मात्र ४५0 रुपयांनी उतरून ४५,000 रुपये किलो झाली.
जागतिक बाजारात नरमाईचा कल राहिला. सिंगापुरात सोने 0.४ टक्क्यांनी उतरून १,३0६.९३ डॉलर प्रति औंस झाले. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव
प्रत्येकी ५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३१,२५0 रुपये आणि ३१,१00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या ८ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,५00 रुपयांवर स्थिर राहिला.
दिल्लीत तयार चांदीचा भाव ४५0 रुपयांनी उतरून ४५ हजार रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदीही ५६५ रुपयांनी उतरून ४५,0३५ रुपये किलो झाली. चांदीचे शिक्के खरेदीसाठी ७७ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७८ हजार रुपये प्रति शेकडा असे आदल्या सत्राच्या पातळीवर स्थिर राहिले.
सेन्सेक्स ९१ अंकांनी तेजीत
मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने तेजीची हॅट्ट्रिक साधली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे ९१ अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे
३१ अंकांनी वर चढला. रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याज दरात अनपेक्षितपणे कपात करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले.
30 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ९१.२६ अंकांनी अथवा 0.३२ टक्क्यांनी वाढून २८,३३४.५५ अंकांवर बंद झाला. तत्पूर्वीच्या दोन सत्रांत सेन्सेक्स ४१५.७६ अंकांनी वाढला होता. व्यापक आधारावरील निफ्टी ३१.0५ अंकांनी अथवा 0.३६ टक्क्यांनी वाढून ८,७६९.१५ अंकांवर बंद झाला. व्यापक बाजारांतही मजबुतीचाच कल दिसून आला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.६६ टक्क्यांनी वाढून १३,२0८.७३ अंकांवर बंद झाला. मीडकॅप 0.५0 टक्क्यांनी वाढून १३,५४९.५१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0पैकी १९ कंपन्यांचे समभाग वाढले.
११ कंपन्यांचे समभाग घसरले. एसबीआयचा समभाग १.५९ टक्क्यांनी वाढला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांचे समभागही वाढले. आशियाई बाजारांतही तेजी दिसून आली. हाँगकाँगचा हँग सेंग 0.४५ टक्के, तर जपानचा निक्केई 0.८३ टक्के वाढला. चीनचे बाजार सार्वजनिक सुटीमुळे बंद होते. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे व्याज दरांबाबत संवेदनक्षम असलेल्या क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला. बीएसई बँकिंग निर्देशांक 0.४२ टक्क्यांनी वाढून २२,४९१.४७ अंकांवर गेला. रिअल्टी निर्देशांकही 0.९६ टक्क्यांनी वाढून १,५७२.६१ अंकांवर गेला. वाहन क्षेत्राचा निर्देशांक 0.0५ टक्क्यांनी वाढून २२,७८६.८१ अंकांवर गेला.
अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था!
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो दरात 0.२५ टक्के कपात करण्यात आली आहे.
By admin | Published: October 5, 2016 04:14 AM2016-10-05T04:14:13+5:302016-10-05T04:14:13+5:30