Join us  

अर्थव्यवस्था होईल डिजिटल

By admin | Published: January 02, 2017 1:01 AM

डिजिटल अर्थव्यवस्था हे भारताचे भविष्य आहे. नव्या वर्षात जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू होईल, असा आशावाद व्यक्त करतानाच गतवर्षाप्रमाणेच नव्या वर्षातही भारत जगातील

नवी दिल्ली : डिजिटल अर्थव्यवस्था हे भारताचे भविष्य आहे. नव्या वर्षात जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू होईल, असा आशावाद व्यक्त करतानाच गतवर्षाप्रमाणेच नव्या वर्षातही भारत जगातील सर्वांत वेगवान विकास करणारी अर्थव्यवस्था ही बिरुदावली कायम राखेल, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अरुण जेटली म्हणाले की, गत वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अतिशय यशस्वी ठरले. आगामी काळातही विकासाचा वेग वाढवून भारत जगातील सर्वाधिक वेगवान अर्थव्यस्था ठरेल. ही परिस्थिती कायम ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरू. महागाईवर सध्या नियंत्रण ठेवले आहे. व्याज दरकपात होत असल्याचे दिसत आहे. नोटाबंदीनंतरच्या प्रक्रियेत अतिशय प्रगती आहे. आगामी काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. जेटली म्हणाले की, २०१७मध्ये जीएसटी लागू होईल, असा विश्वास आहे. तर, डिजिटल अर्थव्यवस्था हे भारताचे भविष्य आहे. काळ्या पैशांसह मोठ्या प्रमाणात पैसा बँकात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक कर्ज देण्याची बँकांची क्षमता वाढणार आहे. नोटाबंदीनंतरच्या प्रक्रियेला नागरिकांनी खूप सहकार्य केले. त्यामुळे आतापर्यंतची प्रक्रिया शांततेत पार पडली. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, छोटे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी कर सवलती जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर जेटली यांनी हे मत व्यक्त केले आहे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईत सामान्य नागरिकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल जेटली यांनी आभार व्यक्त केले. गरीब आणि दुर्लक्षित घटकांसाठी बँकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधानांच्या घोषणांनी आर्थिक व्यवहार वाढतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांमुळे आर्थिक व्यवहार वाढतील, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. यामुळे वाढत्या जीडीपीचाही मार्ग प्रशस्त होईल, असे सांगून जेटली यांनी टिष्ट्वट केले आहे की, कृषी, लघू उद्योग, गृह क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे. जेटली हे फेब्रुवारीत २०१७-१८चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ७.५ लाख रुपयांच्या ठेवींवर आठ टक्के व्याज मिळणार आहे. या घोषणेचेही त्यांनी स्वागत केले. महागाईवर सध्या नियंत्रण ठेवले आहे. व्याज दरकपात होत आहेत. नोटाबंदीनंतरच्या प्रक्रियेत अतिशय प्रगती आहे. आगामी काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असेही जेटली म्हणाले.