सक्तवसुली संचालनालयाने (ED) हीरो मोटोकॉर्पच्या अध्यक्षांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीनं हीरो मोटोकॉर्प लिमिटेडचे सीएमडी आणि अध्यक्ष पवन कांत मुंजाल यांच्या सुमारे २४.९५ कोटी रुपयांच्या दिल्लीतील तीन स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत करण्यात आली आहे. या कारवाईनंतर हीरो मोटोकॉर्पच्या (Hero MotoCorp) शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आणि शेअर १.५० टक्क्यांनी घसरून ३१०९.८५ रुपयांवर आला.ईडीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यांनी मेसर्स हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि सीएमडी पीके मुंजाल आणि इतरांविरुद्ध परकीय चलन बाहेर नेल्याबद्दस महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या कलम १३५ अंतर्गत एफआयआर दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता, असं म्हटलं आहे.या तक्रारीत ५४ कोटी रुपयांचे परकीय चलन भारतातून बेकायदेशीरपणे बाहेर नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पवनकांत मुंजाल यांनी इतर व्यक्तींच्या नावे विदेशी चलन जारी केलं आणि नंतर ते परदेशात आपल्या वैयक्तिक खर्चासाठी वापरलं, असे ईडीच्या तपासात उघड झालं आहे.कसा बाहेर पाठवला पैसाएका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीद्वारे अधिकृत डीलर्सकडून विविध कर्मचार्यांच्या नावावर विदेशी चलन काढून घेतलं आणि नंतर ते पवन कांत मुंजाल यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला दिलं. रिलेशनशिप मॅनेजरनं पवन कांत मुंजाल यांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक सहलींमध्ये वैयक्तिक खर्चासाठी रोख स्वरूपात किंवा कार्डद्वारे परकीय चलन गुप्तपणे पाठवलं. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत प्रति व्यक्ती २.५ लाख डॉलर्स प्रति वर्षची मर्यादा काढण्यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली.ईडीने यापूर्वी १ ऑगस्ट २०२३ रोजी मुंजाल आणि संबंधित संस्था आणि व्यक्तींच्या संबंधात छापे टाकले होते. या छाप्यात डिजिटल पुराव्यांसह २५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. जप्ती आणि जप्तीची एकूण किंमत अंदाजे ५० कोटी रुपये होती. याप्रकरणी ईडीची चौकशी अद्याप सुरू आहे.
Hero चे चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर ED ची मोठी कारवाई, २५ कोटींची संपत्ती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 1:08 PM