Join us

ईडीचा कर्ज बुडव्यांना दणका! मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी कारवाई; १०० कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 10:00 AM

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉण्ड्रिंगसंबंधी दोन विविध प्रकरणांमध्ये सुमारे १२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉण्ड्रिंगसंबंधी दोन विविध प्रकरणांमध्ये सुमारे १२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. एका प्रकरणात वारंवार कर्ज बुडविणाऱ्याची १०० कोटी, तर दुसऱ्या प्रकरणात लॉटरी किंग सॅंटियागो मार्टिन याची २० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

आंध्र प्रदेशातील आयडीबीआय बँकेची फसवणूक करणाऱ्या रेब्बा सत्यनारायण यांच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील शेती, भूखंड, सदनिका व इतर मालमत्ता ईडीने जप्त केल्या. सत्यनारायण याने आयडीबीआय बँकेची १०० काेटी रुपयांची फसवणूक केल्याचा आराेप आहे. एक कर्ज फेडण्यासाठी ताे वारंवार कर्ज घेत हाेता. याशिवाय त्याच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीरपणे किसान क्रेडिट कार्ड याेजनेतून मासाेळ्यांचे तळे उभारण्यासाठी कर्ज घेतल्याचा आराेप करण्यात आला आहे. यासाठी ११३ बाेगस लाभार्थी दाखविण्यात आले. या याेजनेतून ११२ काेटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले हाेते. या पैशातून ताे जुने कर्ज फेडायचा. पुन्हा कर्ज उचलून इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे वापर करून बेनामी मालमत्तांची खरेदी व व्यवसायांमध्ये गुंतवित हाेता.

‘लॉटरी किंग’लाही दाखवला हिसका

लाॅटरी किंग म्हणून ओळखला जाणारा सॅंटियागाे मार्टिन याचीही १९.५९ काेटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. केरळमध्ये सीबीआयने मनीलाॅण्ड्रिंगप्रकरणी गुन्हे दाखल केले हाेते. लाॅटरी व्यवसायात मार्टिन आणि त्याचा भागीदार एन. जयमुरूगन यांनी सिक्कम सरकारचे तब्बल ९१० काेटी रुपयांचे नुकसान केल्याचा आराेप आहे. विजेत्या लाॅटरी तिकिटांची वाढीव संख्या दाखवून पैसे उकळायचे. हा प्रकार १ एप्रिल २००९ ते ३१ ऑगस्ट २०१० या कालावधीत घडला हाेता. या पैशातून त्यांनी कुटुंबीयांच्या नावावर विविध कंपन्यांच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्या हाेत्या. 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालय