मुंबई : यूपीए काळात प्रडंच तोट्यात असलेल्या एअर इंडियासंबंधी झालेल्या खरेदीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ठपका ठेवला आहे. याबाबत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध चार प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यूपीए काळात एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्स यांचे विलीनीकरण झाले होते. या दोन कंपन्यांनी काही विमाने अन्य कंपन्यांना भाडेतत्वावर दिली होती. पण त्यामध्ये अन्य कंपनीला पडद्याआडून फायदा देण्यात आल्याने एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्स या दोघांनाही मोठा तोटा झाला, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे. या दोन प्रकरणात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे.
अन्य दोन प्रकरणे काही खासगी कंपन्यांसाठी एअर इंडियाने स्वत:चे मार्ग रद्द केल्यासंबंधीची आहेत. ‘ईडी’नुसार, एअर इंडियाच्या तत्कालिन अधिकाºयांनी नफ्यात सुरु असलेल्या कंपनीच्या काही आंतरराष्ट्रीय सेवा जाणूनबुजून बंद केल्या. त्याद्वारे खासगी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना फायदा करून देण्यात आला. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात मनी लॉन्डरिंग होऊन काळ्या पैशांची देवाण-घेवाण झाली. त्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. याखेरीज जर्मनीतील सॅप एजी ही कंपनी व आयबीएम यांच्याकडून २२५ कोटी रुपयांचे सॉफ्टवेअर कंपनीने खरेदी केले होते. त्यामध्येही काळ्या पैशांचा वापर झाला.