Flipkart ED Notice : सक्तवसूली संचलनालयानं (ED) परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) कथित उल्लंघनाप्रकरणी वॉलमार्टच्या स्वामित्वाखालील फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीला आणि त्यांच्या प्रवर्तकांना १०,६०० कोटी रूपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत गेल्या महिन्यात १० लोकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट आणि त्याचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांचाही समावेश आहे.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्वांना नोटीस बजावण्यात आली असून कंपनीवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमांचे उल्लंघन आणि मल्टी-ब्रँड रिटेलचे नियमन करणे समाविष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वॉलमार्टचं स्वामित्व असलेली कंपनी आणि त्याचे अधिकारी आता कायदेशीर निर्णयांचा सामना करतील. एजन्सीचे चेन्नई स्थित विशेष संचालक दर्जाचे अधिकारी कार्यवाही करणार असल्याचंही सांगण्यात आलं.
ईडीला सहकार्य करणार - फ्लिपकार्ट
कंपनी एफडीआयसह सर्वच भारतीय नियमांचं पालन करत आहे आणि फेमाच्या कथितरित्या उल्लंघन केल्याप्रकरणी पाठण्यात आलेल्या नोटीसवर सक्तवसूली संचलनालयाला सहकार्य करेल, असं कंपनीनं स्पष्ट केलं. कंपनी एफडीआय नियमांसह भारतीय कायदे आणि नियमांचं पालन करत असल्याचंही कंपनीन म्हटलं आहे.
अधिकारी आपल्या नोटीसनुसार २००९ ते २०१५ या कालावधीतील प्रकरणांसंबधी तपास करणार आहेत आणि आम्ही त्यांना सहकार्य करू असं कंपनीनं म्हटलं आहे. दरम्यान, कंपनीच्या संस्थापकांकडून याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.