नवी दिल्ली/मुंबई : आर्थिक अडचणींमुळे गेल्या वर्षी बंद पडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक व माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला. नरेश गोयल यांच्या मुंबईतील निवासस्थानी व अन्य ठिकाणी ईडीने रविवार, सोमवारी छापेही घातले.
गुन्हा नोंदविल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी नरेश गोयल यांची कसून चौकशी केली. गोयल, त्यांच्या पत्नी अनिता यांच्यावर ४६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका ट्रॅव्हल कंपनीने अनिता यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. मनी लाँडरिंग, तसेच परकीय चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप गोयल यांच्यावर असून, त्याबाबत बुधवारी त्यांचे मुंबईतील निवासस्थान व सीएसएमटीतील कार्यालयावर छापे टाकले. गुरुवारी त्यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. आवश्यकतेनुसार पुन्हा बोलाविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जेट एअरवेज गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बंद पडली. त्याआधी मार्च महिन्यात नरेश यांनी चेअरमनपदाचा, तर अनिता यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. याआधीही गोयल यांच्या नवी दिल्ली व मुंबईतील १२ ठिकाणी छापे पडले होते. त्यांनी २०१४ साली जी गुंतवणूक केली, त्यात भारतीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
>८५00 कोटींचे कर्ज
या कारवाईनंतर गोयल यांच्या परदेशी प्रवासावरही बंदी घालण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही बंदी उठवून त्यांना परदेशात जाण्यास परवानगी दिली. जेट एअरवेजने देशातील २६ बँकांच्या समूहाकडून ८५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, त्याची परतफेड केलेली नाही. ती कंपनी दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात यावी, यासाठीचे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलपुढे आहे.
जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्यावर गुन्हा, मुंबईत ईडीचे छापे
जेट एअरवेजचे संस्थापक व माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:11 AM2020-03-06T05:11:55+5:302020-03-06T05:12:07+5:30