तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणात चर्चेत आलेल्या हिरानंदानी ग्रुपवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हिरानंदानी ग्रुपच्या मुंबईतील मुख्यालय आणि अन्य कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेत. दर्शन हिरानंदानी यांनी अदानी यांच्याविरोधात महुआ यांना संसदेत प्रश्न विचारण्यास सांगितले होते. यामुळे मोईत्रा यांची खासदारकी गेली होती, आता हिरानंदानी ग्रुपवर कारवाई सुरु झाली आहे.
महुआ आणि दर्शन हिरानंदानी यांच्यात संबंध होते असा आरोप भाजपाने केला होता. लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात महुआ यांना पैसे आणि महागडी गिफ्ट दिल्याचा आरोप भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. दर्शन हिरानंदानी हे निरंजन हिरानंदानी यांचे पूत्र आहेत आणि सध्या ते हिरानंदानी ग्रुपचे सीईओ आहेत. दर्शन यांनीच महुआ यांच्याविरोधात बिनसल्यानंतर गौप्यस्फोट केले होते.
आजच्या ईडीच्या कारवाईत हिरानंदानी ग्रुपच्या सर्व कार्यालयांवर छापे मारण्यात आले आहेत. फेमाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हिरानंदानी ग्रुप रिअल इस्टेटमध्ये आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये या ग्रुपचे अनेक प्रोजेक्ट सुरु आहेत.
मार्च 2022 मध्ये आयकर विभागाने मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये पसरलेल्या हिरानंदानी ग्रुपच्या सुमारे 25 ठिकाणांची झडती घेतली होती. करचुकवेगिरीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती.