नवी दिल्ली - विजय माल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi) आणि मेहूल चोक्सी (Mehul Choksi) हे उद्योगपती बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात फरार झाले होते. दरम्यान, या सर्व उद्योगपतींकडून ईडीने सक्तवसुली करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्ता विविध बँकांना देण्यात आल्या असून, स्टेट बँक ऑफ इंडियाने अशा मालमत्तांची विक्री करून शेकडो कोटी रुपयांची आपली थकबाकी वसूल केली आहे. (ED recover Money from Vijay Mallya, Nirav Modi, Mehul Choksi', SBI's huge debt recovered)
एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँक कंसोर्टियमसाठी डीआरटीने शुक्रवारी किंगफिशर एअरलाइन्सचे शेअर विकून ७९२ कोटी रुपयांची वसुली केली. हे शेअर ईडीने बँकेला दिले होते. एसबीआयने यापूर्वी अशाच प्रकारे अॅसेट लिक्विडेशनच्या माध्यमातून ७ हजार १८१.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यासाठी एसबीआय़ने दोन वेगवेगळ्या टप्प्यात अॅसेट लिक्विडेशन केले. यामध्ये पहिल्या टप्प्यात त्यांना १ हजार ३५७ कोटी रुपये मिळाले. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ५ हजार ८२४.५० कोटी रुपये मिळाले. विजय माल्याकडे एसबीआयचे एकूण ९ हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. त्यापैकी तब्बल ८१ टक्के कर्जाची वसुली एसबीआयने कंसोर्टियमच्या माध्यमातून केली आहे.
विजय माल्याच्या कर्ज अफरातफरीच्या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा तपास करताना ईडीने अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये माल्याच्या युनायटेड बेवरेजेस लिमिटेड आणि किंगफिशर एअरलाइन्ससह ७ कंपन्यांच्या मालमत्तांचा समावेश होता. ईडीने विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीच्या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ हजार १०९.१७ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यासाठी त्यांनी ज्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्या संबंधित बँकांना देण्यात आल्या आहेत. किंवा त्या सरकारकडे देण्यात आल्या आहेत.