Join us

ED नं जप्त केली २५ कोटींची करन्सी आणि दागिने, Heroच्या मुंजाल यांच्यावर मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 11:11 AM

वाचा का केली ईडीनं ही मोठी कारवाई.

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनं हीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पीके मुंजाल आणि इतरांवर छापे टाकून सुमारे २५ कोटी रुपयांचे देशी-विदेशी चलन आणि सोनं-हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. याशिवाय ईडीनं हार्ड डिस्क, मोबाईल आणि काही कागदपत्रंही जप्त केली आहेत. मात्र, या कारवाईत प्रत्येक ठिकाणाहून किती रक्कम जप्त करण्यात आली याचा खुलासा ईडीनं केलेला नाही. 

ईडीने मंगळवारी देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरोचे मालक मुंजाल, हेमंत दहिया, केआर रमण, हीरो मोटोकॉर्प आणि हीरो फिनकॉर्प यांच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील निवासस्थान आणि कार्यालयांची झडती घेतली. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. आपण तपासात संपूर्ण सहकार्य करत आहोत याव्यतिरिक्त हीरोकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कशासंदर्भात कारवाईसेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टमची तपास शाखा डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सनं (DRI) दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीनं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या विविध तरतुदींखाली गुन्हा नोंदवला आहे. कस्टम अॅक्टच्या कलम १३५ अंतर्गत दिल्ली न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. डीआरआयनं पीके मुंजाल, अमित बाली, हेमंत दहिया, केआर रमण आणि काही व्यक्तींविरुद्ध तसेच थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर सॉल्ट एक्सपीरियन्स अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (SEMPL) विरुद्ध प्रतिबंधित वस्तू घेऊन जाणं, निर्यात करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. विदेशी चलन.आणि अवैध निर्यात केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

ईडीचं म्हणणं कायकेंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या म्हणण्यानुसार SEMPL ने २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीत सुमारे ५४ कोटी रुपयांचे विदेशी चलन अवैधरित्या निर्यात केलं. हे पैसे पीके मुंजाल यांच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यात आले. ईडीचा आरोप आहे की SEMPL नं हेमंत दहिया, मुदित अग्रवाल, अमित मक्कर, गौतम कुमार, विक्रम बजाज आणि केतन कक्कर या काही कर्मचार्‍यांच्या नावे वार्षिक मंजूरीपेक्षा जास्त विदेशी चलन जारी केलं. याशिवाय, ज्यांनी कधीही परदेशात प्रवास केला नाही अशा इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात परकीय चलन/ट्रॅव्हल फॉरेक्स कार्ड जारी करण्यात आलं.

टॅग्स :हिरो मोटो कॉर्पअंमलबजावणी संचालनालय