Edelweiss Mutual Funds Radhika Gupta : एडलवाइज म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडी राधिका गुप्ता (Radhika Gupta) देशभरात एक प्रसिद्ध नाव आहे. बिझनेस जगतात त्यांची ओळख आधीपासूनच होती, पण लोकप्रिय बिझनेस टीव्ही शो शार्क टँकच्या जज बनल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात लोक त्यांना ओळखू लागले आहेत. सोशल मीडियावरही त्या खूप अॅक्टिव्ह असतात. तसंच लोक गुंतवणुकीबाबतचे त्यांचे सल्ले अतिशय काळजीपूर्वक ऐकतात. राधिका गुप्ता यांची नेटवर्थ जवळपास ४१ कोटी रुपये आहे. मात्र, तरीही त्या इनोव्हा कार चालवतात. त्यांनी कोणतीही लक्झरी कार खरेदी केलेली नाही. याबद्दलचं त्यांचं मत काय आहे हे त्यांनी एका पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलंय.
लक्झरी कार्स आवडतात पण...
राधिका गुप्ता म्हणतात की त्या कधीही लक्झरी कार खरेदी करू शकतो. त्यांना या गाड्या आवडतात. पण त्यांना हा पैशांचा अपव्यय वाटतो. या गाड्यांची किंमत खूप वेगानं कमी होते, त्यामुळे ती आपल्या इनोव्हासोबत प्रवास करणं पसंत करतात. एका पॉडकास्टदरम्यान राधिका गुप्ता यांनी यासंदर्भात भाष्य केलं. आपण एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आहोत. एकेकाळी त्यांना फॅन्सी आणि डिझायनर वस्तू ठेवायला आवडायचं, असं त्या म्हणाल्या. पण आता देशातील सर्वात तरुण सीईओंपैकी एक असलेल्या राधिका गुप्ता यांना या गोष्टींबद्दल कसलीही ओढ राहिलेली नाही. महागड्या वस्तू विकत घेऊन मला कुणालाही माझी उपयुक्तता सिद्ध करायची नाही, असंही त्या म्हणाल्या.
Do middle class roots still make you reluctant to spend on luxuries? They do sometimes for me. @_soniashenoy and I had fun talking about this! https://t.co/V8Zmv8wKQo
— Radhika Gupta (@iRadhikaGupta) September 13, 2024
तेजीनं किंमत कमी होते...
"लक्झरी कार खरेदी करणं ही मोठी बाब नाही. परंतु मला ती विकत घ्यायची नाही. हे एक असं असेट आहे, ज्याचं मूल्य तेजीनं कमी होतं. मला असं असेट माझ्याकडे ठेवायचं नाही. १८ वर्षांपूर्वी मला जेव्हा कोणी डिझायनर बॅग नाहीये का असा प्रश्न विचारायचे तेव्हा वाईट वाटायचं. परंतु आता त्यानं फरक पडत नाही. आता मी अशा ठिकाणी आहे जिकडे माझ्या आयुष्याचे नियम मी स्वत: बनवू शकते. आता मला काहीही सिद्ध करायचं नाही," असं राधिका गुप्ता पॉडकास्टदरम्यान म्हणाल्या.