नवी दिल्ली-
खाद्य तेलाचे दर आता आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे. खाद्य तेलाचे दर कमी करण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं २ वर्षांसाठी खाद्य तेलावरील कस्टम ड्यूटी रद्द केली आहे. सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलावरील कस्टम ड्यूटी रद्द करण्यात आली आहे. खाद्य तेलावरील कृषी, मूलभूत शुल्क आणि विकास सेस देखील रद्द करण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सूर्यफूल तेलावरील आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ साठी दरवर्षाकाठी २० लाख मेट्रीक टनचं आयात शुल्क रद्द करण्यात आलं आहे. यासोबतच सीमा शुल्क आणि कृषी सेससह डेव्हलपमेंट सेस देखील रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. बाजारात खाद्य तेलाचे दर यामुळे कमी होतील अशी आशा आहे.
नुकतंच इंधन दरात करण्यात आली कपात
खाद्य तेलाच्या दरातील कपातीआधी केंद्र सरकारनं इंधन दरात मोठी कपात करत देशातील जनतेला दिलासा दिला आहे. केंद्राकडून पेट्रोलवर ८ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलवर ६ रुपये प्रतिलीटर उत्पादन शुल्क कमी केलं. त्यामुळे देशात पेट्रोलचे दर ९.५० रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ७ रुपये प्रतिलीटर स्वस्त झालं आहे. यासोबतच केंद्रानं एलपीजी सिलिंडरवरही २०० रुपये प्रति सिलिंडर सब्सिडी देण्याचीही घोषणा केली आहे. इंधन दरातील कपातीमुळे इतर वस्तूंच्याही किमतीत किंचितसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
रेकॉर्ड ब्रेक खाद्य तेलाच्या दरांनी जनतेचं कंबरडं मोडलं
गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले होते. महागाईमुळे जनतेचं कंबरडं मोडलेलं असतानाच इंडोनेशियानं पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता २३ मे पासून इंडोनेशियानं पाम तेलावरील बंदी उठवण्याची घोषणा केली. त्यामुळे देशातील सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.