नवी दिल्ली : देशात पाम, खाद्यतेलाच्या किमती उच्चांकी स्तरावरून ३० टक्क्यांनी उतरल्या आहेत; तर कच्चे तेलही १८ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. याचसोबत कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र नफा कमवण्यासाठी उत्पादनांच्या किमती कमी करण्यास कंपन्यांनी नकार दिल्यामुळे कोट्यवधी ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.साबण, शॅम्पू, बिस्किटे आणि पॅकबंद ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन खर्चात गेल्या काही महिन्यांपासून मोठी वाढ झाली होती. मात्र आता कच्चा माल स्वस्त झाला आहे. त्यामुळे दरामध्ये कपात करण्याची मागणी होत असतानाही कंपन्यांनी त्यास नकार देत उत्पादनांच्या किमती आणखी वाढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मार्जिनवर दबावपामतेलाचा वापर साबण, बिस्किटे आणि न्यूडल्स तयार करण्यासाठी होतो; तर कच्चे तेल डिटर्जंट आणि पॅकेजिंगसाठी महत्त्वाचे आहे. खाद्यतेल कंपन्यांनी किमतीत प्रति लिटर १५ ते २० रुपयांनी कपात केली आहे. विप्रो कंझ्युमर केअरचे अध्यक्ष अनिल चुग यांनी म्हटले की, महागाई वाढल्याने एमजीसी कंपन्यांच्या मार्जिनवर मोठा दबाव आला आहे. यामुळे अशा स्थितीत कंपन्या किमती कमी करण्यासाठी तयार नाहीत. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
अन्नधान्य महागाई वाढणारजागतिक रेटिंग एजन्सी, नोमुराने म्हटले की, येणाऱ्या दिवसांमध्ये भारतात अन्नधान्य महागाई दर ९ टक्क्यांच्यावर जाण्याची शक्यता आहे. अन्नधान्य महागाई यावर्षी दुसऱ्या तिमाहीत संपूर्ण आशियात आणखी वाढण्याची शक्यता आहे.