नवी दिल्ली : जुलै महिन्यामध्ये देशातील खाद्यतेलांची आयात वाढली असून, ती ११ महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. आगामी काळामध्ये खाद्यतेलाची आयात वाढत राहण्याचे संकेत मिळत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) या खाद्यतेल व्यापाऱ्यांच्या संघटनेने ही माहिती जाहीर केली आहे. जुलै महिन्यामध्ये १५.१७ लाख टन खाद्यतेले आयात केली गेली. मागील वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये १३.४७ लाख टनांची आयात झाली होती. याचाच अर्थ यंदा १३ टक्क्यांनी आयातीमध्ये वाढ झाली आहे.
>नऊ महिन्यांमध्ये ११ टक्क्यांनी घट
खाद्यतेल आयातीसाठी नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे वर्ष असते. चालू वर्षाच्या नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये आयातीत ११ टक्क्यांनी घट झाली आहे. या कालावधीमध्ये ९५.६९ लाख टन तेलाची आयात झाली आहे. चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये सरकारने पामतेलाचा समावेश प्रतिबंधित उत्पादनांमध्ये केल्यामुळे या तेलाच्या आयातीमध्ये मोठी घट
झाली आहे. याचा परिणाम म्हणून देशातील आयात घटली असल्याचे सांगण्यात येते.
या देशांकडून केली जाते आयात
भारत हा जगातील खाद्यतेलाचा मोठा आयातदार देश असून, विविध देशांकडून विविध प्रकारची तेले आपण आयात करीत असतो. सूर्यफुलाच्या तेलाची आयात ही मुख्यत्वे युक्रेन आणि रशियाकडून केली जात असते. अर्जेंटिनाकडून सोयाबीन आणि काही प्रमाणामध्ये अन्य तेलांची आयात होत असते. देशात येणारे पामतेल हे मुख्यत: मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमधून येत असते.
खाद्यतेलांच्या आयातीत झाली वाढ, जुलैमध्ये ११ महिन्यांतील उच्चांक
सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) या खाद्यतेल व्यापाऱ्यांच्या संघटनेने ही माहिती जाहीर केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:04 AM2020-08-20T03:04:30+5:302020-08-20T06:42:21+5:30