नवी दिल्ली : केंद्र सरकारने मध्यस्थी केल्यानंतर खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत. गेल्या काही दिवसांत तेल कंपन्यांकडून दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आता पुन्हा एकदा फॉर्च्युन ब्रँड (Fortune Brand) अंतर्गत उत्पादन विकणारी खाद्य तेल कंपनी अदानी विल्मारने (Adani Wilmar) आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर दर कमी करण्याचे म्हटले आहे. खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती.
सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येईल. यापूर्वी, धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत 14 रुपयांनी कपात केली होती.
दरम्यान, खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी खाद्य मंत्रालयाने 6 जुलै रोजी बैठक बोलावली होती. यादरम्यान, सर्व खाद्य तेल कंपन्यांना जागतिक स्तरावर दरात झालेल्या घसरणीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, "जागतिक दरात झालेली घट आणि खाद्यतेलाच्या किमतीतील कपातीचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न पाहता, अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी केल्या आहेत. गेल्या महिन्यातही दर कमी करण्यात आले होते."
फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 165 रुपये प्रति लीटर झाली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लीटर झाली आहे. मोहरीच्या तेलाची कमाल किरकोळ किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 190 रुपये प्रति लीटर इतकी कमी करण्यात आली आहे.
तसेच, फॉर्च्युन राईस ब्रान ऑइलची किंमत 225 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अंगशु मलिक म्हणाले, "आम्ही जागतिक स्तरावर किमतीतील कपातीचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवले आहेत आणि नवीन माल लवकरच बाजारात पोहोचेल."