एकीकडे वाढत चाललेली महागाई, त्यात आजच पन्नास रुपयांनी वाढविलेला गॅस सिलिंडर. यात आता एक दिलासा देणारी माहिती येत आहे. येत्या काही दिवसांत खाद्य तेलाच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. सरकारने खाद्य तेलाचे दर कमी करण्यासाठी बुधवारी उद्योजकांची बैठक बोलावली होती. यामध्ये कपातीवर चर्चा झाली आहे.
जागतिक बाजारात खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घट झालेली आहे. यानुसार केंद्र सरकार या तेलाच्या दरात कपात करण्याच्या प्रयत्नात आहे. सर्व तेल कंपन्आंनी गेल्या महिन्यात तेलाचे दर १० ते १५ रुपयांनी घटविले होते. सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) चे कार्यकारी निदेशक बी. व्ही. मेहता यांच्यानुसार गेल्या एका महिन्यात खाद्य तेलाचे दर 300-450 डॉलर प्रति टनापर्यंत घटले आहेत. यामुळे सर्वच तेल कंपन्यांकडून दरात कपात करण्याची घोषणा होऊ शकते. यावेळी ती १० ते १५ रुपये एवढी असेल, असे ते म्हणाले.
भारत खाद्य तेलाच्या एकूण मागणीच्या ६० टक्के तेल आयात करतो. 2020-21 मध्ये 131.3 लाख टन तेल आयात करण्यात आले. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी 22 जून रोजी सांगितले होते की किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती खाली येऊ लागल्या आहेत. त्याच काळात खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती.
जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असली तरी त्याचा थेट फायदा अद्याप ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. गेल्या महिन्यात सरकारच्या सूचनेनुसार सर्व खाद्य तेल कंपन्यांनी दरात कपात केली होती, मात्र ती अपुरी असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत सरकारच्यावतीने पुन्हा एकदा बैठक घेऊन तेलाच्या किमती कमी करण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात.