नवी दिल्ली : या सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. पामतेलाचे भाव एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. जागतिक मंदीमुळे सोयाबीन, सीपीओ, पामोलिन आणि सूर्यफुलाच्या किमती जवळपास निम्म्याने खाली आल्या आहेत. दुसरीकडे, नवीन सोयाबीन पिकाची तुरळक आवक सुरू झाल्याने त्याचाही खाद्यतेलाचा भावावर परिणाम होऊ लागला आहे.
विदेशी बाजारातील मंदीचा परिणाम खाद्यतेलाच्या किमतीसह सर्वच वस्तूंच्या किमतीवर होत आहे. विदेशी बाजारात घसरण झाल्यानंतर स्थानिक बाजारात तेल आणि तेलबियांच्या किमती घसरल्या आहेत. विदेशी बाजारातील नरमाईमुळे दिल्ली बाजारात सोमवारी जवळपास सर्वच तेल-तेलबियांच्या किमतीत घसरण झाली आहे. मलेशिया एक्सचेंजमध्ये सोमवारी 5.25 टक्क्यांची मोठी घसरण झाली. तसेच, शिकागो एक्सचेंज देखील एक टक्क्याने घसरला आहे.
सर्व तेल-तेलबियांच्या किमतीत मोठी घसरण होऊनही, तेल कंपन्यांची एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) उच्च राहिली आहे. जवळपा चार महिन्यांपूर्वी 2100 डॉलर प्रति टन कांडला पामोलिनची किंमत घसरून 950 डॉलर प्रति टन झाली आहे. असे असतानाही किरकोळ विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने दर घेतले जात असल्याने या घसरणीचा लाभ ग्राहकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या (Palm Oil)किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर भारताने ऑगस्ट महिन्यात विक्रमी पाम तेलाची आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये पाम तेलाच्या आयातीत 87 टक्के वाढ झाली आहे, जी 11 महिन्यांतील सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाची किंमत एका वर्षातील नीचांकी पातळीवर आली आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा पाम तेल आयातदार ( Palm Oil Importer) देशांपैकी एक आहे. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याच वेळी, सर्वात मोठा उत्पादक असलेल्या इंडोनेशियाला इंव्हेंटरी कमी करण्यात मदत केली जाईल. ऑगस्टमध्ये भारताने 994,997 टन पाम तेलाची आयात केली होती, तर जुलैमध्ये 530,420 टन होती.
सप्टेंबरमध्ये भारत 10 लाख टन पाम तेल आयात करू शकतो, असे म्हटले जाते. उर्वरित खाद्यतेलापेक्षा पाम तेल स्वस्तात उपलब्ध असल्याने कंपन्यांनी आक्रमकपणे पाम तेल आयात केले आहे. त्याचवेळी भारतात सणासुदीचा हंगाम (Festive Season) दाखल होणार आहे. त्यामुळे लग्नसराईचा हंगामही एकत्र येत आहे. अशा परिस्थितीत पामतेलाची मागणी वाढू शकते.