नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलसोबतच खाद्यतेलाच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. देशभरात खाद्यतेलाच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या असून गेल्या ११ वर्षांमधील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकांचे उत्पन्न घटले असताना किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. शेंगदाणा, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, वनस्पती तसेच पाम तेलाच्या किमती २० ते ५६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्राहक कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार, पॅकबंद मोहरी तेलाची किंमत ४४ टक्क्यांनी वाढून १७१ रुपये प्रतिकिलो झाली आहे. गेल्या वर्षी ही किंमत ११८ रुपये प्रतिकिलो होती. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्याही किमतीत ५० टक्के वाढ झाली आहे. या सर्व तेलाच्या किमती ११ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. ऐन कोरोना काळात खाद्यतेलाची भरमसाठ दरवाढ झाली आहे. भारताला सुमारे ५६ टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. याचा परिणाम भारतातील किमतींवर झाला आहे. वाढ कशामुळे?आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे, अनेक देशांमध्ये जैविक इंधनाचा वाढता वापर हे आहे. त्यासाठी खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोयाबीनसारख्या उत्पादनाचा वापर अमेरिका, ब्राझील इत्यादी देशांमध्ये जैविक इंधनासाठी होत आहे. तर ‘ला नीना’चा प्रभाव आणि इंडोनेशिया व मलेशियामध्ये कच्च्या पाम तेलावर निर्यात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. याचाही परिणाम किमतींवर झाला आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या ५ वर्षांमध्ये खाद्यतेलाची मागणी सुमारे २६ दशलक्ष टन एवढी राहिली आहे. मात्र, देशांतर्गत पुरवठा केवळ ११ दशलक्ष टन एवढाच आहे. सुमारे १३ ते १४ दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात करावी लागते.
महागाईची फोडणी! खाद्यतेलाच्या दराचा 11 वर्षांतील उच्चांक; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरवाढीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 5:59 AM