लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारत आता अमेरिकेवर अवलंबून नाही. दोन्ही देश समान पातळीवर काम करत आहेत. त्यामुळेच शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आदी क्षेत्रांत आता भागीदारीच्या माध्यमातून मोठे उद्दिष्ट साध्य करायचे आहे, असे सांगून शैक्षणिक व वैद्यकीय व्हिसा तत्काळ दिला जाईल, अशी ग्वाही अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांनी दिली. हँकी यांनी सोमवारी मुंबईत ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
वाणिज्यदूत असलेल्या हँकी यांच्या वैयक्तिक व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेत पत्रकार म्हणून झाली. त्यामुळे ‘लोकमत’च्या भेटीत ते विशेष रमले. प्रारंभी ‘पत्रकारिता परमो धर्म:’ या तत्त्वाशी लोकमत कसा कटिबद्ध आहे, यावर लोकमत मीडियाचे आणि एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी भाष्य केले.
भाषिक वर्तमानपत्रांचे काम कसे चालते, त्यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक मुद्द्यांच्या अनुषंगाने भौगोलिक योगदान कसे आहे, याची हँकी यांनी माहिती घेतली. त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा व सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी समर्पक उत्तरे दिली. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान आणि देशाच्या अर्थकारणातील व अन्य राजकारणातील महत्त्व या मुद्द्यांशी हँकी यांना अवगत करून दिले. महाराष्ट्रातील प्रांतिक मुद्दे, अस्मिता या कशा वेगळ्या आहेत, त्या मुद्द्यांभोवती तिथले समाजकारण कसे फिरते आणि याची स्पंदने ग्रामीण भागातून शहरी भागात आलेल्या ‘लोकमत’ने कशी टिपली आहेत, याची माहिती देवेंद्र दर्डा यांनी दिली. तर राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात दमदार अस्तित्व असलेल्या ‘लोकमत’च्या डिजिटल प्रवासाची विस्तृत माहिती यावेळी ऋषी दर्डा यांनी दिली, भारतामध्ये एवढे प्रांतिक, सांस्कृतिक वैविध्य आहे, असा वैविध्य असलेला देश कोणत्या मुद्द्यावर एकत्र येतो, असा प्रश्न हँकी यांनी विचारला असता, त्यावर आमच्या शेजारी देशाच्या मुद्द्यावर आम्ही देशवासीय कायमच एकत्र असतो, असे उत्तर तत्काळ विजय दर्डा यांनी दिले. सुमारे पावणेदोन तास झालेल्या या चर्चेमध्ये हँकी यांनी सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी अमेरिकी कॉन्सुलेटचे प्रवक्ता ग्रेग पारडो आणि कॉन्सुलेटच्या वरिष्ठ माध्यम सल्लागार सुमेधा रायकर-म्हात्रे, ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.
आयुष्यात पहिल्यांदा फेटा बांधला
लोकमत मीडियाचे आणि एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देत माईक हँकी यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, यावेळी हँकी यांना पारंपरिक महाराष्ट्रीय फेटाही बांधण्यात आला. आपण आयुष्यात पहिल्यांदा फेटा बांधत असल्याने त्यांनी आवर्जून सांगितले. या पारंपरिक स्वागताचे त्यांनी विशेष कौतुक केले. ‘लोकमत’मध्ये आल्यापासून परत जाईपर्यंत त्यांनी बांधलेला फेटा तसाच ठेवला होता.
वडा-पाव आणि
हुरडा खाल्ला
अस्सल मराठी मनाशी नाते सांगणारा वडा-पाव आणि मराठमोळा हुरड्याचा त्यांनी आस्वाद घेतला. हे पदार्थ आपण प्रथमच खात आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मेडिकल इन्फॉर्मेशन केंद्रासाठी सकारात्मक
अनेक लोक आरोग्याच्या महत्त्वपूर्ण उपचारांसाठी अमेरिकेला जातात; परंतु तेथील कोणत्या प्रांतात कोणत्या वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम आहेत, याची फारशी माहिती लोकांना बऱ्याच वेळा नसते. त्यामुळे मेडिकल इन्फॉर्मेशन केंद्र सुरू केल्यास त्याचा मोठा फायदा लोकांना होईल, अशी विजय दर्डा यांनी केलेली सूचना अत्यंत मोलाची असून, त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याची तयारी हँकी यांनी तातडीने दर्शविली.
व्हिसा कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट
व्हिसाला विलंब होत असल्याचे सातत्याने बोलले जाते. मात्र, हँकी म्हणाले, कॉन्सुलेटमध्ये जे काम करतात, त्यांचा खर्च हा प्रामुख्याने व्हिसा अर्जांद्वारे मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून असतो. कोरोना लॉकडाऊनमुळे व्हिसासाठी अर्जच आले नाहीत. परिणामी, त्यांचे उत्पन्न जवळपास शून्यावर आले होते. त्यामुळे कर्मचारी कपात झाली होती; परंतु आता स्थिती पूर्ववत झाल्यामुळे व्हिसा कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट केली आहे. व्हिसा प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले असून, शैक्षणिक, वैद्यकीय आणि बिझनेससाठी आपण प्राधान्याने व्हिसा देण्याचे काम सुरु केल्याचे म्हणाले.