तुम्ही कधी ना कधी कुठे ना कुठे जाता येता दुकानांवर किंवा जाहिरातींमध्ये स्लीपवेलचं नाव नक्कीच ऐकलं असेल. आता स्लीपवेल या मॅट्रेस तयार करणाऱ्या कंपनीनं कर्ल-ऑन (Curl-on) ही कंपनी विकत घेतल्याचं वृत्त समोर आलंय. हा करार 2,150 कोटी रुपयांचा असल्याचा सांगण्यात येत आहे. हे अधिग्रहण शीला फोम्सचे सर्वात मोठे अधिग्रहण असल्याचेही म्हटले जातेय.
परंतु या कंपनीची स्थापना कोणी केली हे तुम्हाला माहीत आहे का? सध्या या कंपनीची धुरा राहुल गौतम यांच्याकडे आहे. त्याची आई शीला गौतम यांनी 1971 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. आपण आज त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता हे जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या एका कुटुंबात झाला. नंतर त्यांचा विवाह एका लष्करी अधिकाऱ्याशी झाला. परंतु शीला गौतम मन व्यापार आणि राजकारणात होतं. म्हणूनच त्यांनी यशस्वी असा शीला समूह स्थापन केला. इतकंच नाही तर त्यांनी आपली राजकारणाची आवडही जपली. त्या सलग चार वेळा लोकसभेच्या सदस्याही राहिल्या.
शीला गौतम यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३१ रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या एका कुटुंबात झाला. त्या मूळच्या अलिगडमधील गभना तहसीलमधील वीरपुरा गावच्या रहिवासी होत्या. त्यांचे वडिलांचं नाव मोहनलाल गौतम आणि आईचं द्रौपदी गौतम होतं. मोहनलाल गौतम हे स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचे प्रमुख नेते होते. काकोरी घटनेत त्यांना लाहोर येथून अटक करण्यात आली होती. ते उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते.
शिक्षण किती?शीला गौतम यांचं सुरुवातीचं शिक्षण गावातूनच झाले. त्यांना शाळेत जाण्यासाठी रोज पाच किलोमीटर पायी जावं लागत होतं. यानंतर पुढे त्यांनी लखनौ येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून बीए केलं आणि नंतर B.Ed आणि नंतर डिप्लोमा इन मॅनेजमेंटचं शिक्षणही घेतलं.
लष्करी अधिकाऱ्याशी विवाहशीला गौतम यांचा विवाह लष्करी अधिकाऱ्याशी झाला होता. त्यांच्या पतीचं नाव लेफ्टनंट कर्नल एचएस गौतम होतं. पण नंतर कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. या सर्व घटनांनी विचलित न होता त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. शिक्षण क्षेत्राचं त्यांनी शिक्षण घेतलं असलं तरी त्यांचं मन व्यवसाय आणि राजकारणात रमलेलं होतं.
कशी उभी केली कंपनी?ही गोष्ट 1971 ची आहे. त्यावेळी शीला गौतम या अवघ्या 39 वर्षांच्या होत्या. अचानक त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांची दोन लहान मुलंही होती. परंतु त्यांनी न डगमगता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी देशात लायसन्स परमिट राज सुरू होतं. तथापि, लष्कराच्या पुनर्वसन योजनेमुळे त्यांना व्यवसाय करण्यासाठी परवाना किंवा परवानगी मिळू शकली. त्यावेळी त्यांच्याकडे व्यावसायासाठी संपर्क किंवा भांडवलही नव्हतं, तरीही त्यांनी या क्षेत्रात येण्याचं ठरवलं. योगायोगाने त्यांना एक आर्थिक भागीदार सापडला. वडिलांचे सहकार्य त्यांना होतंच. यानंतर त्यांनी गाझियाबादमध्ये शीला फोमचा कारखाना सुरू झाला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.
राजकारणाची सुरुवातशीला गौतम यांनी काँग्रेसमधून राजकारणातील प्रवासाला सुरुवात केली. त्या दहा वर्षे काँग्रेस महिला सभेच्या जिल्हाध्यक्ष होत्या. पण नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 1991 ते 2004 अशी सलग 13 वर्षे अलिगढ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून त्या खासदार होत्या. 1991 मध्ये त्या पहिल्यांदा भाजपच्या खासदार झाल्या. यानंतर त्यांनी 1996, 1998 आणि 1999 मध्ये सलग चार वेळा निवडणूक जिंकली. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला.
फोर्ब्स मॅगझिनमध्ये स्थानफोर्ब्स मासिकाने 2018 मध्ये 119 अब्जाधीश भारतीयांची यादी तयार केली होती. या यादीत भारतातील आठ महिलांनी आपलं स्थान निर्माण केलं होतं. यामध्ये अलीगडच्या माजी खासदार शीला गौतम यांच्या नावाचाही समावेश होता. देशातील आठ महिलांमध्ये शीला गौतम सातव्या क्रमांकावर होत्या. तर जागतिक क्रमवारीत त्या 1999 व्या क्रमांकावर होत्या. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 1.01 अब्ज डॉलर्स असल्याचं सांगण्यात आलं होतं.
देशभरात 10 कारखानेसध्या शीला फोम्सचे देशभरात 10 कारखाने आहेत. याशिवाय कंपनीचे ऑस्ट्रेलियात तीन आणि स्पेनमध्ये एक कारखाना आहे. आज मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स 1,237 रुपयांवर व्यवहार करत आहेत. सध्या कंपनीचं मार्केट कॅप 12 हजार कोटी रुपयांच्या पुढे आहे.