नवी दिल्ली: संपूर्ण जगासमोर आर्थिक संकटाचा धोका असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मरगळ आल्यानं ९० टक्के देशांच्या विकास वाढीच्या दरावर परिणाम झाल्याचं संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जास्त असल्यानं भारतावर याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं जॉर्जिएवा म्हणाल्या.
या वर्षात जगातील ९० टक्के देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग अतिशय कमी असेल, असं भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी वर्तवलं. जागतिक अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीवर जॉर्जिएवा यांनी भाष्य केलं. बल्गेरियाच्या अर्थतज्ज्ञ असलेल्या जॉर्जिएवा यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये व्यवस्थापकीय संचालिका म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
आठवड्याभरानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची संयुक्त वार्षिक बैठक होईल. त्यात या दोन्ही संस्था जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल अंदाज व्यक्त करतील. या बैठकीला जगातील प्रमुख बँकांचे प्रमुख आणि महत्त्वाच्या देशांचे अर्थमंत्री सहभागी होतील. पुढील वर्षातही अर्थव्यवस्थेसमोरील संकट कायम असेल, असा धोक्याचा इशारादेखील त्यांनी दिला.
...म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 01:54 PM2019-10-09T13:54:47+5:302019-10-09T13:58:31+5:30