नवी दिल्ली : भारताला उत्पादन अर्थात मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाचे सक्षम केंद्र बनविण्याची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मेक इन इंडिया’चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला. देश उच्च आर्थिक वृद्धीदर प्राप्त करू शकेल व रोजगार संधी वाढाव्यात म्हणून सुशासन व प्रभावी सरकार असण्याची गरज असून यासाठी सज्ज असल्याचे मोदी यांनी सांगितले. ‘मेक इन इंडिया’ अभियानाचा मोदी यांच्या हस्ते गुरुवारी येथे शुभारंभ झाला. याप्रसंगी मोदी म्हणाले, देशात मजबूत भौतिक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासोबतच डिजिटल नेटवर्कही उभे करण्यावर भर देणार आहे. कार ते सॉफ्टवेअर, उपग्रह ते पाणबुडी आणि कागद ते वीज यांच्या उत्पादनांचे जागतिक केंद्र बनण्यासाठी भारत तयार आहे.सुप्रशासनासोबतच प्रभावी व सुलभ यंत्रणा असण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी टाटा समूहाचे सायरस मिस्त्री, मुकेश अंबानी, अझीम प्रेमजी, कुमारमंगलम बिर्ला, चंदा कोचर आणि वाय. सी. देवेश्वर यांच्यासह देशातील नामवंत उद्योगपती व उद्योगजगतातील इतर बड्या हस्ती उपस्थित होत्या. पंतप्रधानांनी स्थानिक व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आवाहन करत सरकार केवळ ‘पूर्वेकडे पाहा’ धोरण नव्हे तर ‘पश्चिमेला जोडा’ धोरणाचाही अवलंब करत असल्याचे नमूद केले. आम्हाला महामार्ग हवे आहेत. डिजिटल इंडियासाठी माहिती मार्गाचीही आवश्यकता आहे, असे मोदी म्हणाले. ‘मेक इन इंडिया’ हा निव्वळ नारा किंवा आमंत्रण नाही, तर एक जबाबदारी आहे.देशाच्या आर्थिक वृद्धीत उत्पादन क्षेत्राची भागीदारी वाढविण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी व कौशल्य विकासावर मोदी यांनी भर दिला. सरकार विकासाबाबत वचनबद्ध असून यात राजकारण नसून हा आस्थेचा प्रश्न आहे, असे मोदी म्हणाले. वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, व्यवसाय सुलभतेसाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. उद्योगांसाठीची परवाना प्रक्रिया व नियंत्रणाचा अडथळा संपविणे व भारताला उच्च वृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.देशातील कामगार कायद्यात व्यापक बदल करण्याची गरज असल्याचे टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री म्हणाले. मिस्त्री यांनी देशात उपलब्ध मनुष्यबळ व एक अब्ज डॉलरहून अधिक ग्राहकांची बाजारपेठ ही बलस्थाने असल्याचे यावेळी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्रभावी सरकारही गरजेचे
By admin | Published: September 26, 2014 5:19 AM