विजयकुमार सैतवाल
जळगाव : रशिया-युक्रेनमधील तणावामुळे निर्माण झालेल्या अस्थितरतेमुळे सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी एकाच दिवसात चांदीच्या भावात दोन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तसेच सोन्याचेही भाव ५० हजारांच्या पुढे जात ५० हजार ३०० रुपये प्रति तोळा झाले आहेत.
जानेवारी महिन्यात भाववाढ होत गेलेल्या सोने-चांदीचे भाव फेब्रुवारी महिन्यात कमी-कमी होत गेले. विशेष म्हणजे १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीवरील कर कपात झाली नाही तर सोने-चांदीचे भाव वाढले नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चांदी ६२ हजार ५०० ते ६२ हजार ८०० रुपयांपर्यंत खाली-वर होत होती. काही दिवसांपासून सोन्याच्याही भावात फारसा फरक नव्हता.
तणावाच्या स्थितीवर भाव अवलंबून राहणार
रशिया व युक्रेनमधील तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. विदेशातून आयात होणाऱ्या या मौल्यवान धातूंच्या आवकवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.