विकास झाडेनवी दिल्ली : यंदा देशात खाद्य तेल आणि तेलबियांमध्ये देशाने स्वावलंबी व्हावे म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने तेलबियांचे विक्रमी उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (तेल बियाणे आणि पामतेल) अंतर्गत शेतकऱ्यांना तेलबियांचे वाण मोफत वाटण्यात येणार आहे.
कृषी मंत्रालयाने खरीप हंगाम-२०२१ मध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या तेलबियांच्या वाणाचे मिनी किटच्या रूपात मोफत वाटपाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे. तेलबिया आणि पामतेलाचे उत्पादन वाढल्यास तेलाची आयात कमी करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रबोधन कार्यक्रम सुरू केला आहे. या अनुषंगाने तेलबियांच्या विशेष खरीप कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त ६.३७ लाख हेक्टर जमीन आणण्यात येईल. यातून १२०.२६ लाख क्विंटल तेलबिया तसेच २४.३६ लाख टन खाद्यतेल उत्पादन होईल असा अंदाज कृषी मंत्रालयाने वर्तवला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमधील ४१ जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रासाठी सोयाबीन बियाण्याचे वाटप करण्यात येईल. त्यासाठी ७६.०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या राज्यात मिनी किटचे वाटपमहाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहार या नऊ राज्यांमधील ९० जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना वाणाचे मिनी किट वितरण केले जाईल. त्यासाठी ४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याअंतर्गत १० लाख ६ हजार ६३६ हेक्टरवर ८ लाख १६ हजार ४३५ किटच्या माध्यमातून तेलबियांचे उत्पादन घेण्यात येणार आहे. या वितरित केल्या जाणाऱ्या सोयाबिन बियाण्यांची उत्पादन क्षमता २० क्विंटल प्रति हेक्टरपेक्षा अधिक राहणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, आंधप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये ७४ हजार शेतकऱ्यांना भुईमुगाचे वाण मोफत उपलब्ध करून दिले जाईल. ही बियाणे प्रति हेक्टर २२ क्विंटल उत्पादन देईल त्यासाठी १३.०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च केंद्रीय कृषी खाते करणार आहे.