नवी दिल्ली
अंडं आधी की कोंबडी? हा वाद न संपणारा आहे. पण जीएसटी अथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग्जच्या (AAR) कर्नाटक पीठानं आता हा वाद संपुष्टात आणला आहे. अंड हे अॅग्री प्रोडक्ट म्हणजेच शेती उत्पादन आहे की नाही याचा निर्णय दिला आहे. अंड हे एक अॅग्री प्रोडक्ट असून त्याच्या वाहतुकीसाठी वस्तू आणि सेवा कर (GST) लागणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
रेल्वे कंटेनरमधून संपूर्ण देशभर अंडी पोहोचवणारी कंपनी SAS Cargo नं एएआरकडे याबाबतची मागणी केली होती. अंड्यांच्या वाहतुकीसाठी जीएसटी आकारला जाणार की नाही याबाबत स्पष्टता असावी अशी मागणी कंपनीनं केली होती. एएआरनं १८ जून २०१७ सालच्या नोटिफिकेशननुसार अंड हे एक अॅग्री प्रोडक्ट असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे अंड्यांच्या वाहतुकीवर जीएसटी आकारता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
जीएसटी कमिशनकडून मागितला सल्ला
जीएसटीच्या नोटिफिकेशननुसार शेती आणि पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या गोष्टी अॅग्री प्रोडक्ट अंतर्गत गणल्या जातात. यात खाद्य, फायबर, कच्चा माल यापद्धतीच्या वस्तूंचाही समावेश आहे. पण यात घोडे पालनचा समावेश नाही. पण नोटिफिकेशनमध्ये याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे की शेतकऱ्यानं शेतीतल्या उत्पादनावर कोणतीही प्रक्रिया केलेली असता कामा नये. शेतीतून मिळणारं पण त्यावर कोणतीही प्रक्रिया न केलेलं उत्पादन अॅग्री प्रोडक्टमध्ये येतं. उप्तादनाचं मूळ स्वरुप बदलता कामा नये, असा नियम आहे.
अंड्यांवर जीएसटी आकारला जावा की नाही याबाबत जीएसटी कमिश्नरचं देखील मत मागवण्यात आलं होतं. त्यात त्यांनी अॅग्री प्रोडक्टबाबतच्या नोटिफिकेशन मागचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना दिलासा देणं हाच होता. जेणेकरुन शेतकऱ्यांना पशुपालन आणि रेशम किटक पालनसारख्या शेतीशी निगडीत व्यवसायांना चालना देता येईल. ताजी अंडी ही देखील अॅग्री प्रोडक्टमध्येच येतात. त्यामुळे रेल्वेच्या माध्यमातून अंड्यांची वाहतूक करणं जीएसटीच्या अंतर्गत येत नाही.