नवी दिल्ली : आगामी दसरा-दिवाळी सणात आॅनलाईन खरेदीवर जवळपास आठ अब्ज डॉलर (५२ हजार कोटी रुपये) खर्च केले जाण्याची शक्यता एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. यंदा ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
‘असोचेम’च्या एका सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या निष्कर्षानुसार विविध कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या सवलती आणि भेटवस्तू पाहता ग्राहक ५२ हजार कोटी रुपयांची खरेदी करू शकतात.
नवरात्रापासून सणवार सुरू होतात. दसरा-दिवाळी झाल्यानंतर नाताळपर्यंत म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत हेच वातावरण राहणार आहे. आॅनलाईन कंपन्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या वस्तूत मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, डिझायनर फर्निचर, वस्त्रे, दागिने, पादत्राणे आदींचा समावेश आहे. देशात तशी मंदी असली तरीही या वस्तूंच्या विक्रीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात ग्राहकांनी ३० हजार कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या होत्या.
असोचेमचे महासचिव डी.एस. रावत म्हणाले की, स्मार्ट फोन, टॅबलेट आणि अन्य मोबाईल उपकरणांच्या वाढत्या वापराने ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवहार वाढला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आॅनलाईन खरेदीत उडणार आठ अब्ज डॉलर
आगामी दसरा-दिवाळी सणात आॅनलाईन खरेदीवर जवळपास आठ अब्ज डॉलर (५२ हजार कोटी रुपये) खर्च केले जाण्याची शक्यता एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
By admin | Published: October 11, 2015 10:31 PM2015-10-11T22:31:05+5:302015-10-11T22:43:52+5:30