नवी दिल्ली : वाहन क्षेत्रातील मंदीमुळे सलग आठव्या महिन्यात मारुती सुझुकीला कारचे उत्पादन सुमारे १८ टक्क्यांनी कमी करावे लागले आहे. या कंपनीने सप्टेंबर महिन्यात १ लाख ३२ हजार १९९ कार्सचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरात कंपनीने १ लाख ६0 हजार २१९ कार तयार केल्या होत्या.
कंपनीने या सप्टेंबरात अल्टो, न्यू वॅगनआर, सेलेरिओ, इग्निस, स्विफ्ट, बालेनो व डिझायर या मॉडेल्सच्या ९८ हजार ३३७ कार तयार केल्या. गेल्या वर्षी याच महिन्यात या मॉडेल्सच्या १ लाख १५ हजार ५७६ कारचे उत्पादन कंपनीने केले होते. सेडन सियाझचे उत्पादन तर गेल्या वर्षी सप्टेंबरच्या तुलनेत यंदा सुमारे निम्म्यावर आले आहे. आॅगस्टमध्ये कंपनीने कारच्या उत्पादनामध्ये ३३.९९ टक्के घट केली होती.
ह्युंदाई, टाटा मोटर्स टोयोटा, होंडा यांनाही सप्टेंबर महिन्यात मागणीच्या अभावी उत्पादनामध्ये मोठी कपात करावी लागली. वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले की, या कंपन्यांच्या कार्सची मागणी खूपच घटली आहे. सर्व कंपन्यांची मिळून मागणी निम्म्यावर आली आहे.
वर्षभरात नॅनोची निर्मितीच नाही
टाटा मोटर्सने तर या सप्टेंबरमध्ये कार उत्पादनात तब्बल ६३ टक्के कपात केली आहे. सप्टेंबरात कंपनीने केवळ ६,९७९ कारचीच निर्मिती केली. गेल्या वर्षी याच काळात कंपनीने १८ हजार ८५५ कार तयार केल्या होत्या. या संपूर्ण वर्षात टाटाने एकही नॅनो कार तयार केली नाही. वर्षभरात एकच नॅनो कार विकली गेली. तीही फेबु्रवारीमध्ये विकली गेली. टाटाने यापुढे नॅनो कारची निर्मिती तयार न करण्याचा मानस व्यक्त केला होता, पण त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नॅनो कार २00८ साली बाजारात आणण्यात आली होती. गेल्या वर्षभरात केवळ २९९ नॅनो कार विकल्या गेल्या होत्या.
सलग आठव्या महिन्यात मारुतीने १८ टक्क्यांनी कमी केले कारचे उत्पादन
कंपनीने या सप्टेंबरात अल्टो, न्यू वॅगनआर, सेलेरिओ, इग्निस, स्विफ्ट, बालेनो व डिझायर या मॉडेल्सच्या ९८ हजार ३३७ कार तयार केल्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:10 AM2019-10-09T05:10:58+5:302019-10-09T05:15:01+5:30