Join us

Electric Vehicles : चूक झाली आता आणखी नाही! पाहा काय आहे इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणाऱ्यांचं दु:ख? सर्व्हेतून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 3:42 PM

काही वर्षांपूर्वी भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicle) मोठा बोलबाला होता. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत होतं. याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार भरमसाठ सबसिडी देण्यात येत होती. पण आता अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांपासून दूर जाण्याच्या विचारात दिसून येत आहेत. पाहा याची कारणं काय.

काही वर्षांपूर्वी भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicle) मोठा बोलबाला होता. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत होतं. याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार भरमसाठ सबसिडी देण्यात येत होती. इतकंच काय तर प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांनीही एकापाठोपाठ एक घोषणा केल्या होत्या. अनेक राज्यांनी त्यावर स्वतंत्र अनुदान देण्यास सुरुवात केली, तर काहींनी त्याची नोंदणी मोफत केली. पण मात्र इलेक्ट्रिक वाहन नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ लोकांवर आलीये. ५१ टक्के मालक डिझेल-पेट्रोल कारकडे वळणार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय.

सतत असते चिंता

पार्क + नं इलेक्ट्रिक वाहनांच्या ५०० हून अधिक मालकांचा सर्व्हे केला. त्यात ८८% ईव्ही मालक आपली वाहनं बाहेर काढल्यानंतर चार्जिंग स्टेशनची चिंता करत असल्याचं समोर आलंय. आपल्या वाहनाची रेंज तितकीशी नाही, असं त्यांना वाटतं. म्हणून त्यांना सुलभ, सुरक्षित आणि कार्यात्मक चार्जिंग स्टेशन शोधण्याबद्दल अधिक चिंता वाटत असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.

आता पुन्हा ईव्ही नको

पार्क प्लसच्या सर्वेक्षणात ५१ टक्के इलेक्ट्रिक कार मालकांनी पुन्हा इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणार नसल्याचे सांगितले. पुढील कार घ्यायची झाल्यास पेट्रोल किंवा डिझेल किंवा सीएनजी कार असेल. तर काहींना कंपनीनं आपल्याला सेकंड हँड ईव्हीचीच चावी पहिल्यांदा हाती दिली आहे, असं वाटत असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय.

रेंज महत्त्वाची चिंता

इलेक्ट्रिक कार चालवताच रेंज चिंता 'रेंज एन्झायटी'ला बळी पडतात, असं या सर्वेक्षणातील अनेकांनी अधोरेखित केलं. केवळ घरून ऑफिस आणि ऑफिसहून घर असाच प्रवास केला जात नाही, तर अनेकदा लाँग ड्राईव्हलाही जातात. या प्रवासात वाटेत चार्जिंग स्टेशन सापडलं नाही तर गाडी 'टो' करून घरी आणावी लागेल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे ते ईव्हीने लांब पल्ल्याचा प्रवास करण्यास टाळाटाळ करतात, असंही सर्वेक्षणातून समोर आलंय. दुसरीकडे ७३ टक्के ईव्ही मालकांना त्याचा देखभालीचाखर्च अस्पष्ट वाटतो, तसंच सामान्य मेकॅनिककडेही जाता येत नसल्यानं त्यांना यासाठी शोरुममध्ये जावं लागतं. हे वेळखाऊ आहे, तसंच महागही पडत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

रिसेल व्हॅल्यू नाही

याव्यतिरिक्त, ३३ टक्के लोकांनी ईव्हीच्या रिसेल व्हॅल्यूबद्दल असमाधान व्यक्त केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या रिसेल व्हॅल्यूमध्ये लक्षणीय घट झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत ईव्ही बॅटरीच्या गुणवत्तेचं मूल्यमापन करण्यासाठी प्रमाणित चाचणीचं मॉड्यूल आलेलं नाही. आजही ईव्हीच्या किमतीच्या ३० टक्क्यांहून अधिक बॅटरीची किंमत असते, असं त्यांचं म्हणणं आहे.

चार्जिंग इन्फ्राची कमतरता

ईव्ही मालकांच्या मनात पहिला प्रश्न हाच असतो की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे? देशभरात २० हजारांहून अधिक ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. पण जर तुम्ही तुमची ईव्ही घेऊन रस्त्यावर उतरलात तर ती सापडत नाहीत. यामुळे ईव्ही मालक इंटरसिटी प्रवास टाळतात, असंही यात म्हटलंय.

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटर