नवी दिल्ली : ग्राहकांच्या दैनंदिन उपयोगातील विविध इलेक्ट्रिकल उपकरणे शनिवारपासून स्वस्त होणार आहेत. जीएसटी परिषदेने ८६ वस्तूंवरील जीएसटीमध्ये मागच्या आठवड्यात कपात केली होती. नवे दर २८ जुलैपासून लागू होत आहे. आता सॅनिटरी नॅपकिन्स व राखी यासारख्या वस्तू करमुक्त होणार आहेत.जीएसटी परिषदेने सर्वाधिक १० टक्क्यांची कपात इलेक्ट्रिकल उपकरणांवर केली आहे. यावर आता २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी लागेल. त्यात वॉशिंग मशीन, एसी, मिक्सर, टीव्ही, वॉटर हीटर्स आदींचा समावेश आहे. इलेक्ट्रिक वाहनांना लागणारी लिथियम आयर्नी बॅटरी, भिंतींना देण्यात येणाऱ्या रंगावरील करातही १० टक्क्यांची कपात होऊन ते १८ टक्क्यांच्या श्रेणीत येत आहेत. ज्वेलरी बॉक्स, फोटो फ्रेम, आरसे, धातूच्या शोभेच्या वस्तू, हस्तकलेचे दिवे आदींवरील कर १८ वरुन १२ टक्क्यांवर आला आहे. तर सतरंज्या, हातमागाच्या चादरी, खते, तयार कापड, तेल कंपन्यांसाठी इथेनॉलवरील जीएसटी १२ वरुन ५ टक्क्यांवर आला आहे. सॅनिटरी नॅपकिन, राख्या, मार्बल, झाडूसाठी लागणारा कच्चा माल आदी वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत.
इलेक्ट्रिकल उपकरणे आजपासून होणार स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:21 AM