Join us

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 12:02 AM

सोलापूर : अडीच हजार कामगारांची रोजीरोटी थांबली

सोलापूर : लॉकडाउनच्या काळात सोलापूरच्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत दररोजची ७० लाखांची उलाढाल ठप्प आहे. मागील २५ दिवसात जवळपास १५ कोटींचा फटका या बाजारपेठेला बसला आहे. याबरोबरच या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या जवळपास अडीच हजार कामगारांची रोजीरोटीही थांबली आहे.

सध्या उन्हाळा आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल-मे महिन्यात कूलर, एसी, पंख्याबरोबरच फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मागणी वाढते. सध्या मागणी असूनही संचारबंदीमुळे ग्राहकांपर्यंत या वस्तू वितरकांना पोहोचविता येत नाहीत. लॉकडाउनमुळे व्यापारपेठ पूर्णत: बंद झाली. या व्यापारावर अवलंबून असलेल्या कामगारांना मार्च महिन्याचा पगार व्यावसायिकांनी देऊन पुढील काळाची व्यवस्था केली आहे. आता या कामगारांचीही परवड सुरु झाली आहे. अनेक कुटुंबात ज्येष्ठ नागरिक आहेत. काही कुटुंबात रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी या उन्हाळ्यात पंखा, एसी, कुलरची मागणी होतेय. या वस्तू तातडीने पुरवणे गरजेचे ठरले आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या वस्तू अत्यावश्यक असल्यामुळे त्या पुरवण्यासाठी सरकारने संचारबंदीत २ ते ३ तासांची सवलत देऊन या वेळेत दुकाने चालू ठेवण्याची मागणी आहे.अक्षय्यतृतियाही बंदमध्येच जाणार?दरवर्षी गुढीपाडव्याला मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात व्हायची. यंदा लॉकडाऊनमध्ये गुढीपाडवा आला. त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाली. शहरात १७५ कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स वितरक आहेत. तसेच जवळपास शंभर विक्रेते आहेत. अशा जवळपास २७५ विक्रेत्यांचा व्यवसाय सुरु आहे. त्यांच्यावर जवळपास अडीच हजार कामगार अवलंबून आहेत. लॉकडाउनमुळे साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्यतृतीयादेखील खरेदी-विक्रीविना जाणार असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :सोलापूरव्यवसाय