मुंबई : महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांवर आता महाग कर्जाचा मोठा भार पडणार आहे. आरबीआयने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केल्यानंतर देशभरातील बँकांकडून गृह आणि वाहन कर्जासह सर्व कर्जे महाग करण्यात आली आहेत. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेसह आयसीआयसीआय बँक, पीएनबी, बँक ॲाफ इंडिया आणि इतर अनेक बँकांनी व्याजदरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाचा ईएमआय वाढणार आहे.
बँक ॲाफ बडोदा आणि पीएनबीने वाढविलेले नवे व्याज दर गुरुवारपासून लागू केले आहेत. तर आयसीआयसीआय बँक आणि बँक ॲाफ इंडियाने बुधवारी व्याज दरात वाढ केली आहे. व्याज दरात वाढ केल्याने गृह कर्ज, वाहन कर्जासाठी पहिल्यापेक्षा अधिक ईएमआय द्यावा लागणार आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अन्य बँकाही व्याज दर वाढविण्याच्या तयारीत आहेत.
एचडीएफसीचेही गृह कर्ज महागले
- देशातील सर्वात मोठी गृह वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडने तिच्या कर्जदरात ५० आधार बिंदूंनी वाढ केली आहे. त्यामुळे कंपनीच्या विद्यमान कर्जदारांना वाढीव हप्ता येणार आहे.
- ही व्याज दर वाढ शुक्रवार (१० जून)पासून लागू करण्यात आली आहे. याधीही बँकेने ९ मे आणि २ मे रोजी व्याज दरात अनुक्रमे ०.३० टक्के आणि ०.०५ टक्क्यांनी वाढ केली होती.
३५ दिवसांत रेपो दर ०.९० टक्क्यांनी वाढला
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने दोन महिन्यांत दुसऱ्यांदा रेपो दर ०.५० टक्क्यांनी वाढवून ४.९० टक्के केला आहे. ४ मे रोजीही रेपो दर ०.४० टक्क्यांनी वाढविण्यात आला होता.
३५ दिवसांत रेपो दर ०.९० टक्क्यांनी वाढला आहे. या वाढलेल्या व्याज दराचा फटका बँका आता थेट ग्राहकांवर टाकत असून, यामुळे ईएमआय आणखी वाढणार आहे.
बँक समभागांना येणार झळाळी
- आरबीआयकडून रेपो दरात वाढ केल्याने आता बँकांकडून व्याज दरात वाढ करण्यात येत आहे.
- यामुळे किरकोळ आणि लहान ग्राहकांना कर्ज घेणे कठीण होणार आहे. यामुळे लोक पहिल्यांदा खर्च करताना विचार करतील.
- त्याचवेळी बाजारातील गुंतवणूकही कमी होईल. आरबीआयच्या या निर्णयाने बँकांची कमाई वाढण्याची शक्यता असून, यामुळे बँकांचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.
महागाई वाढणार?
वर्षभर महागाई वाढत जाण्याची शक्यता आरबीआयने व्यक्त केली आहे. देशाला कच्चे तेल ७५ डॅालर प्रति बॅरल या दराने परवडते. मात्र आता ते १२५ डॅालरवर पोहोचल्याने महागाई नियंत्रणात आणणे आव्हानात्मक झाले आहे.
असा बसणार फटका
२० वर्षांसाठी ५० लाखांचे
गृह कर्ज असल्यास...
एक महिना व्याज दर ईएमआय
याअगोदर ७.०% ३८,७६५
आता ७.९% ४१,५११
फरक ०.९% २,७४६
बँकांचे नवे व्याज दर
बॅंक जुने दर नवे दर
पीएनबी ६.९ ७.४
बँक ॲाफ इंडिया ७.२५ ७.७५
बँक ॲाफ बडोदा ६.९० ७.४०
आयसीआयसीआय बँक ८.१० ८.६०
सेंट्रल बँक ॲाफ इंडिया ७.१० ७.६०
फेडरल बँक ७.६५ ८.१५
आरबीएल बँक ९.५० १०
एचडीएफसी बँक ७.४५ ७.९५
बँक ॲाफ महाराष्ट्र ७.२० ७.७०
एसबीआय ६.६५ ७.०५
कॅनरा बँक ७.३५ ७.४०
(आकडे टक्केमध्ये)
जुलै महिन्यात आरबीआयची पुन्हा एकदा बैठक होणार असून, यावेळी रेेपो दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.