Join us  

टॅक्स वाचवण्यासाठी Elon Musk बनले दानशूर! 5.7 अब्ज डॉलरचे शेअर केले दान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:57 AM

Elon Musk : रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाने ही माहिती यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिली आहे. मात्र, एलन मस्क यांनी ही देणगी कोणत्या संस्थेला दिली आहे, याचा खुलासा झालेला नाही.

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क (Elon Musk) यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे  (Tesla) एकूण 5,044,000 शेअर्स दान केले आहेत.  एलन मस्क यांनी 19 ते 29 नोव्हेंबर दरम्यान हे दान केले आहे. दरम्यान, टेस्ला ही जगातील सर्वात मोठी ऑटो कंपनी आहे आणि त्यावेळी कंपनीच्या शेअरच्या किमतीनुसार ही रक्कम 5.74 अब्ज डॉलर इतकी आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाने ही माहिती यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिली आहे. मात्र, एलन मस्क यांनी ही देणगी कोणत्या संस्थेला दिली आहे, याचा खुलासा झालेला नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांनी 16.4 अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स विकले. यासाठी त्यांनी ट्विटरवर एक पोल देखील घेतला होता आणि आपल्या फॉलोअर्सना विचारले होते की, त्यांनी टेस्लामधील 10 टक्के हिस्सा विकावा की नाही. तसेच, या पोलचा निकाल काहीही लागला तरी त्यांना शेअर्स विकावे लागतील, असेही ते म्हणाले होते.

एलन मस्क यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, 2021 मध्ये त्यांना 11 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर भरावा लागेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर एलन मस्क यांनी टेस्लाचे शेअर्स गिफ्ट केले तर त्यांना त्यातून कर लाभ मिळू शकतो. कारण सेवाभावी संस्थांना दिलेल्या देणग्या भांडवली नफा कराच्या अधीन नाहीत. एलन मस्क यांनी 2001 मध्ये मस्क फाउंडेशनची स्थापना केली, ज्याची संपत्ती 20 कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे. दरम्यान, एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. Bloomberg Billionaires Index नुसार, त्यांची एकूण संपत्ती 227 अब्ज डॉलर आहे.

टॅग्स :टेस्लाव्यवसाय