टेल्साचे सीईओ आणि स्पेस एक्स कंपनीचे मालक आणि जगविख्यात अब्जाधीश एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ट्विटरच्या बोर्डावर घेण्य़ास कंपनीने नाकारल्यानंतर मस्क यांनी ट्विटरला अब्जावधी डॉलर्सची ऑफर देऊ केली आहे.
मस्क यांना ट्विटरमध्ये १०० टक्के मालकी हक्क विकत घ्यायचे आहेत. यासाठी त्यांनी एका शेअरमागे 54.20 डॉलर मोजण्याची तयारी दर्शविली आहे. ट्विटरसाठी ते 41 अब्ज डॉलर मोजायला तयार आहेत. गेल्याच आठवड्यात एलन मस्क हे ट्विटरच्या बोर्डावर येणार असल्याचे वृत्त आले होते. यानंतर मस्क यांनी ट्विटरशी निगडीत काही पोस्ट आणि मतांचे कौलही घेण्य़ास सुरुवात केली होती. यामध्ये ट्विट एडिट करण्याचा पोल देखील होता. ज्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.
परंतू काही काळाने ट्विटरच्या सीईओंनी मस्क ट्विटरच्या संचालक बोर्डावर येणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांची नेहमी आम्ही मार्गदर्शन घेत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता मस्क यांचा वादग्रस्त इतिहास पाहता ते ट्विटरला असे सोडतील असे वाटत नव्हते. अखेर मस्क यांनी आपला डाव खेळला आहे. मस्क यांनी आपली ऑफर स्वीकारली नाही तर ट्विटरमधील मी गुंतवलेल्या पैशांचा मला पुनर्विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे.
मस्क यांच्या ऑफरचे वृत्त आल्यानंतर ट्विटरच्या शेअरमध्ये अचानक १३ टक्क्यांची वाढ झाली. परंतू टेस्लाचे शेअर्स पडले. टेस्लाचे शेअर्स १.५ टक्क्यांनी पडले आहेत.