elon musk net worth : भारतच नाही तर जगभरातील शेअर बाजार सध्या प्रचंड अस्थिर झाले आहेत. यात सर्वसामान्य गुंतवणूकदारच नाही तर मोठमोठे उद्योगपतीही आपली मोठी संपत्ती गमावून बसले आहेत. यामुळेच उद्योगपती मुकेश अंबानी जागतिक श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. मात्र, अंबानींपेक्षा जास्त दुःखी आणखी एक व्यक्ती आहे, इलॉन मस्क. कारण, मुकेश अंबानी यांनी आयुष्यभरात जेवढी संपत्ती कमावली, त्यापेक्षा जास्त पैसे मस्कने अवघ्या ३ महिन्यात गमावले आहेत.
इतकी संपत्ती गमावूनही मस्क यांच्या आसपासही कोणी नाही
शेअर बाजाराच्या घसरणीत जगातील टॉप २० श्रीमंतांपैकी १३ जणांची संपत्ती घसरली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांचे यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स सारख्या अनेक कंपन्या चालवणाऱ्या मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत यावर्षी ९५.४ अब्ज डॉलरची घट झाली आहे. हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अंबानींची एकूण संपत्ती ९१.३ अब्ज डॉलर आहे. या घसरणीनंतरही, मस्क ३३७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर कायम आहेत.
कुणाची संपत्ती वाढली, कुणाची कमी झाली?
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती १६.५ अब्ज डॉलरने घसरली असून ती २२२ अब्ज डॉलरवर आली आहे. मस्क यांची एकूण संपत्ती त्यांच्यापेक्षा ११५ अब्ज डॉलरहून अधिक आहे. जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकचे संस्थापक मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग २१३ अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ५.७६ अब्ज डॉलरने वाढली आहे. फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट हे १७२ अब्ज डॉलर्ससह चौथ्या स्थानावर आहेत आणि लॅरी एलिसन १६८ अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर आहेत. अर्नॉल्ट यांनी या वर्षी ४.६१ अब्ज डॉलर गमावले असून ॲलिसनचे २३.९ अब्ज डॉलरचे नुकसान झाले.
वाचा - मुकेश अंबानींची श्रीमतांच्या यादीत घसरण, रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या
टॉप १० मध्ये कोण आहेत?
वॉरेन बफे यांनी या वर्षी सर्वाधिक कमाई केली आहे. १६७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या स्थानावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती २५.१ अब्ज डॉलरने वाढली आहे. बिल गेट्स यांच्या एकूण संपत्तीतही या वर्षी ४.६८ अब्ज डॉलरने वाढ झाली असून १६३ अब्ज डॉलर संपत्तीसह ते जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. लॅरी पेज यांनी या वर्षी २०.८ अब्ज डॉलर गमावले असून १४८ अब्ज डॉलरसह आठव्या स्थानावर आहे. तर सर्गेई ब्रिन १३९ अब्ज डॉलरसह नवव्या आणि स्टीव्ह बाल्मर १३७ अब्ज डॉलरसह दहाव्या स्थानावर आहे. या वर्षी ब्रिन यांना १९.४ अब्ज डॉलर आणि बाल्मर यांना ९.५५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले.