जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी सोशल मीडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपला पहिला ई-मेल पाठवला आहे. बुधवारी रात्री उशिरा मस्क यांनी ट्विटर कर्मचाऱ्यांना मेल पाठवला असून यामध्ये कर्मचाऱ्यांना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मेलमध्ये मस्क यांनी कर्मचार्यांना पुढील कठीण काळासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या मेलमध्ये त्यांनी वर्क फ्रॉम होम ही सुविधा बंद करण्याची घोषणा केली. तर आर्थिक दृष्टीकोन चांगला नसून ट्विटरसारख्या जाहिरातींवर आधारित कंपनीवर त्याचा मोठा परिणाम होईल, असंही म्हटलं आहे.
मस्क यांनी मेलमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार, "आर्थिक दृष्टीकोन चांगला नाही हे शुगरकोट करण्याचा कोणताही मार्ग नाही. याचा ट्विटरसारख्या जाहिरातींवर अवलंबून असलेल्या कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो." रिपोर्टनुसार, मस्क यांनी सांगितले की, आता घरून कोणतेही काम होणार नाही. कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून किमान 40 तास कार्यालयात घालवावे लागणार आहेत. काही गरजांच्या प्रकरणांमध्ये ते स्वतः याबाबत परवानगी देतील.
मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेण्यापूर्वी ट्विटर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी काम कुठूनही करण्याचं धोरण घेऊन आले होते. साथीच्या काळात कर्मचाऱ्यांना घरून कामावर जावे लागले. तर वर्षाच्या सुरुवातीला ट्विटर विकत घेण्याच्या कराराची घोषणा केल्यानंतर, मस्क म्हणाले की ते घरून काम करण्याच्या विरोधात आहे. त्यांनी म्हटले की घरातून काम करण्याची परवानगी केवळ विशेष परिस्थितीत दिली गेली पाहिजे. यापूर्वी मस्क यांनी त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी, टेस्लामध्येही घरातून काम करण्याची सुविधा बंद केली आहे.
बुधवारी रात्री ट्विटरवर मस्क यांचा एक प्रयोग पाहायला मिळाला. बुधवारी रात्री अनेक व्हेरिफाईड अकाऊंटवर ऑफिशियल लेबल दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हेरिफाईड अकाऊंटसवर ऑफिशियल बॅच दिसला. मात्र, काही वेळातच हे गायब झाला. मस्क यांनी ट्विटरवर लिहिले की, कंपनी येत्या काही महिन्यांत अनेक मूर्ख गोष्टी करत राहील, जे चांगले दिसेल ते ठेवले जाईल आणि जे काम करत नाही ते बदलले जाईल. ट्विटरने गेल्या आठवड्यात आपल्या अर्ध्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. अशाप्रकारे सुमारे 3500 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. तसेच ट्विटरने भारतातील जवळपास 90 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"