जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांची इंटरनेट प्रोव्हायडर कंपनी स्टारलिंक (Starlink) ला मोठा झटका बसला आहे. भारतात लाँच होण्याआधीच अवघ्या तीन महिन्यांत स्टारलिंकच्या भारतातील प्रमुखाने राजीनामा दिला आहे. स्टारलिंकला भारतात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सॅटेलाईट इंटरनेट देणाऱ्या स्टारलिंकने कोणतीही परवानगी मिळालेली नसताना भारतात प्री बुकिंग सुरु केली होती. यामुळे सरकारने कंपनीला त्या ग्राहकांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. हे पैसे परत करण्यास सुरुवात झालेली असताना आता स्टारलिंक इंडियाचे प्रमुख संजय भार्गव यांनी नोकरी सोडत असल्याची घोषणा केली आहे. स्टारलिंकमध्ये येऊन त्यांना तीन महिनेच झाले होते. या प्रकारमुळे स्टारलिंकची भारतातील वाटचाल खडतर असल्याचे दिसत आहे.
भार्गव यांनी मंगळवारी उशिरा लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी वैयक्तीक कारणांमुळे स्टारलिंकच्या भारतातील संचालक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. ३१ डिसेंबर हा माझा कंपनीतील शेवटचा दिवस होता. यावर माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाहीय, असेही त्यांनी म्हटले आहे.
भार्गव यांनी १ऑक्टोबर २०२१ मध्ये स्टारलिंकचे अध्यक्षपद स्वीकारले होते. यानंतर ठीक तीन महिन्यांनी त्यांनी पद सोडले आहे. याआधीही त्यांनी मस्क यांच्यासोबत काम केले आहे. पेपलच्या सुरुवातीला ते मस्क यांच्या जागतीक टीममध्ये होते.