सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter) च्या ब्लू-टिकसाठी पैसे आकारणे सुरू केल्यानंतर आता इलॉन मस्क यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. आता X वर नवीन अकाउंट ओपन करण्यासाठीही तुम्हाला पैसे द्यावे लागतील. फेक अकाउंट्सवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. “नॉट अ बॉट”, असे या सबस्क्रिप्शन मॉडेलचे नाव आहे.
काय आहे नवीन नियम ?नवीन नियमांनुसार, तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. तुम्ही पैसे दिले नाही, तर अकाउंट ओपन होईल, पण तुम्हाला त्यावर ट्विट करता येणार नाही. तुम्ही फक्त इतरांचे ट्विट पाहू शकाल. यासाठी कंपनीने 1 USD डॉलर, म्हणजेच सुमारे 80 रुपये वार्षिक दर ठरवला आहे. सध्या न्यूझीलंड आणि फिलीपाईन्समध्ये हे सुरू करण्यात आले आहे, भविष्यात इतर देशांमध्येही हे लागू केले जाऊ शकते.
या पोस्टवर नेटीझन्स विविध कमेंट्स करत आहेत. बहुतांश लोकांना हा निर्णय आवडलेला नाही. अनेकांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे अनेक युजर्स ट्विटर अकाउंट डिअॅक्टिव्हेट किंवा अॅप डिलीट करू शकतात. या निर्णयावर विविध मीम्सही शेअर केले जात आहेत. सध्या दोन देशांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे, भारतात कधी सुरू होणार, हे अद्याप समोर आले नाही.