Join us

Elon Musk Twitter: एलन मस्कनी शब्द फिरवला! कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे ट्विटर मॅनेजर्सना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 9:05 AM

मस्क हे सुरुवातीपासूनच ट्विटरमध्ये बदल करण्याचे बोलत आले आहेत. यामध्ये मॅसेजच्या अक्षरांची संख्या वाढविणे, ट्विट एडिटचा पर्याय ठेवणे, ज्या कंपन्या ट्विटरवर आहेत त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन घेणे असे हे बदल आहेत.

ट्विटर खरेदी करताच जगविख्यात अब्जाधीश त्यांच्या मूळ स्वभावानुसार वागू लागले आहेत. डीलच्या आदल्याच दिवशी सिंक घेऊन पोहोचलेल्या मस्क यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार नाही, असा शब्द दिला होता. परंतू, दोन दिवसांनी लगेचच ट्विटरच्या मॅनेजरना कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. 

Parag Agrawal vs Elon Musk: पराग अग्रवालशी पंगा मस्कना महागात पडणार; साडेतीन अब्ज रुपये मोजावे लागणार

मीडिया रिपोर्टनुसार ट्विटरमध्ये साडे सात हजार कर्मचारी काम करतात. यापैकी ७५ टक्के कर्मचारी काढून टाकण्याचे मस्क यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. गुंतवणूकदारांच्या बैठकीत मस्क यांनी हा प्लॅन ठेवला होता. परंतू, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरू लागताच त्यांनी यावरून घुमजाव केले होते. परंतू, आता ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकायचे आहे त्यांच्या नावाची यादी तयार करण्याचे आदेश मस्क यांनी मॅनेजरना दिले आहेत. 

मस्क हे सुरुवातीपासूनच ट्विटरमध्ये बदल करण्याचे बोलत आले आहेत. यामध्ये मॅसेजच्या अक्षरांची संख्या वाढविणे, ट्विट एडिटचा पर्याय ठेवणे, ज्या कंपन्या ट्विटरवर आहेत त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन घेणे असे हे बदल आहेत. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच काही तासांतच सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. यावरच मस्क थांबतील असे वाटत होते. परंतू, त्यांनी आता आपला मोर्चा कर्मचाऱ्यांकडे वळविला आहे. 

महत्वाचे म्हणजे ट्विटरची डील मस्क यांनी केली नसती तरी देखील कंपनी २८ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार होती. यामुळे मस्क हीच कपात कायम ठेवतात की त्यांना अपेक्षित असलेली ७५ टक्के कपात लागू करतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच ट्विटरचे नेतृत्व कोण करणार हे मस्क यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.मी पैसे कमावण्यासाठी ट्विटर विकत घेतलेले नाही, तर मला जे आवडते ते म्हणजेच 'माणुसकीला मदत करण्यासाठी ट्विटर विकत घेतल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ट्विटर स्वतंत्र झाल्याचेही ते म्हणाले होते. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर