Join us  

इलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; Twitter शी संबंधित सर्व वस्तूंचा होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 4:11 PM

ट्विटरबाबत अनेक धक्कादायक निर्णय घेणाऱ्या इलॉन मस्क यांनी आता लिलावाचा निर्णय घेतला आहे.

सोशल नेटवर्किंग साईट Twitter विकत घेतल्यानंतर Elon Musk यांनी यात अनेक बदल केले. सुरुवातीला त्यांनी ट्विटरला पेड करण्याचा मोठा निर्णय घेतला, त्यानंतर अलीकडेच त्यांनी ट्विटरचे नाव बदलून X केले. आता त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरमधील सर्व वस्तुंचा लिलाव होणार आहे. लिलावाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. 

अलीकडेच इलॉन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. त्यानंतर आता ट्विटरच्या वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून असे दिसून येते की, ट्विटरशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना एक्समध्ये विलीन करण्याची इच्छा नाही. 

लिलाव 12 सप्टेंबरपासून सुरू होणार जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटरशी संबंधित प्रत्येक वस्तूचा लिलाव करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये इमारतीच्या साइनबोर्डपासून ते लोगो आणि इतर वस्तूंचा(खुर्ची, टेबल) समावेश आहे. या लिलावाला ट्विटर रिब्रँडिंग असे नाव देण्यात आले आहे. लिलाव पूर्णपणे ऑनलाइन असेल. या लिलावात ट्विटरशी संबंधित सर्वच गोष्टींचा लिलाव होईल. 

या वस्तूंचा लिलाव होणार मीडिया रिपोर्टनुसार, 12 सप्टेंबर रोजी लिलाव होणार असून तो दोन दिवस चालणार आहे. हेरिटेज ग्लोबल पार्टनर्सने सांगितले की, प्रत्येक वस्तूची किमान बोली रक्कम $25(सुमारे 2100 रुपये) ठेवण्यात आली आहे. ट्विटरशी संबंधित 584 वस्तू लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये कॉफी टेबल, मोठ्या पक्ष्यांचा पिंजरा आणि व्हायरल फोटोंचा समावेश आहे. इतर उत्पादनांबद्दल बोलायचे तर, डेस्क आणि खुर्च्या, डीजे बूथ आणि इंस्ट्रीमेंट्स लिलावात ठेवण्यात आली आहेत.

 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटरव्यवसायतंत्रज्ञान