जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या ट्विटरच्या मालकाने त्यांच्या मुलाचे नाव एका महान भारतीय वैज्ञानिकाच्या नावावरुन ठेवलं आहे. स्वत: एलन मस्क यांनी यासंदर्भात माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी ब्रिटेनमध्ये होत असलेल्या एआय सुरक्षा संमेलन २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. यावेळी, टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांच्यासोबत त्यांची भेट झाली.
राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्यासमवेतच्या भेटीचा वृत्तांत दिला. त्यानुसार, एलॉन मस्क यांच्यासोबत भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाबाबत माहिती दिली. चंद्रशेखर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात सांगितले आहे. एलॉन मस्क आणि शिवॉन जिलिस यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर आहे. सन १९८३ साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक एस. चंद्रशेखर यांच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आले आहे.
चंद्रशेखर यांनी ट्विटरवरुन मस्क यांच्यासमवतेचा फोटो शेअर केला आहे. ब्रिटेनच्या बैलेचले पार्कमध्ये एआय सुरक्षा संमेलनमध्ये माझी भेट एलॉन मस्क यांच्यासोबत झाली. यावेळी, मस्क यांनी त्यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर आहे, ते नोबेल विजेते भारतीय शास्त्रत्र एस. चंद्रशेखर यांच्या नावारुन ठेवल्याचे सांगितले, अशी माहिती चंद्रशेखर यांनी लिहिली आहे. त्या ट्विटला रिप्लाय करताना शिवॉन जिलिसनेही दुजोरा दिला आहे. हाहा.. हे खरं आहे, आम्ही त्याला शॉर्टमध्ये शेखर असं म्हणतो. मात्र, हे नाव आमच्या मुलांसाठी वारसा आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरुन निवड करण्यात आलं होतं, असे शिवॉन यांनी म्हटलं.
दरम्यान, एलॉन मस्क आणि शिवॉन यांनी लग्न केले नाही, पण त्यांना दोन जुळी मुले आहेत. शिवॉन जिलिस ही कॅनेडातील वेंचर भांडवलदार असून टेक्नॉलॉजी व एआयच्या क्षेत्रात काम करते. तसेच, ती न्यूरॉलिंकची डायरेक्टरहीआहे. न्यूरॉलिंक ही एलॉन मस्क यांनी सुरु केलेली न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. जी इम्प्लांटेबल ब्रेन-मशिन इंटरफेस विकसित करते.