जगातील सर्वात श्रीमंतर उद्योगपती एलन मस्क यांची कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात एन्ट्री करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एलन मस्क यांच्या या प्रयत्नांना रतन टाटा यांची टाटा मोटर्स कंपनी झटका देऊ शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इलेक्ट्रिक वाहनांवरील 100% आयात कर कमी करू नये, यासाठी टाटा मोटर्स भारत सरकारच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, टाटा मोटर्स देशांतर्गत उद्योग आणि त्यातील गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहे.
असं आहे कारण -
भारतीय बाजारात एन्ट्री करण्याच्या टेस्लाच्या योजनेसंदर्भात सरकार आढावा घेत आहे. टेस्लाने भारतात कारखाना सुरू करण्याचा प्रस्तावही दिला आहे. मात्र, याच बरोबर, इलेक्ट्रिक कारसाठी इंपोर्ट टॅक्स कमी करण्याचीही मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय आणि इतर विभागांसोबत झालेल्या बैठकीत टाटाने या योजनेला विरोध केला आहे. मात्र, टाटा आणि पंतप्रधान कार्यालयाने, टिप्पणीच्या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही. याशिवाय भारतातील इलेक्ट्रिक उद्योगाला चालना देण्याची गरज असल्याचा युक्तिवादही टाटा ने केला आहेत.
भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मात्यांपैकी एक असलेल्या टाटाने 2019 मध्ये आपल्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स व्यवसायाला सुरवात केली. खाजगी इक्विटी फर्म टीपीजी आणि अबू धाबीची होल्डिंग कंपनी एडीक्यूने 2021 मध्ये टाटाच्या या कंपनीमध्ये 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. या व्यवसायाचे मूल्य अंदाजे 9 बिलियन डॉलर एवढे होते.