जगातील टॉप अब्जाधीशांपैकी एक असलेले इलॉन मस्क आपली टेस्ला कार घेऊन लवकरच भारतात येण्याच्या तयारीत आहेत. मस्क याच महिन्यात भारतात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ते भारतामध्ये कार मॅन्यूफॅक्चरिंगसंदर्भात भारत सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार मस्क 22 एप्रिलला भारतात येत आहेत. इलॉन मस्क भारतात येण्यापूर्वीच टेस्लानेटाटासोबत एक मोठा करार केला आहे. महत्वाचे म्हणजे, या कराराने केवळ टाटालाच नाही, तर भारतालाही एक मोठा फायदा होणार आहे.
टेस्ला-टाटा करार -
इलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला आणि रतन टाटा यांची कंपनी टाटा समूह यांच्यात मोठा करार झाला आहे. इलॉन मस्क यांनी टेस्ला कारच्या सेमीकंडक्टर चिप्ससाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत एक मोठा करार केला आहे. टेस्ला कारमध्ये आता टाटाच्या चिप्स वापरल्या जातील. माध्यमांतील वृत्तांनुसार, टेस्लाने आपल्या कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर चिप्ससाठी टाटासोबत करार केला आहे. मात्र, हा करार किती रुपयांचा आहे, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही.
भारताला होणार मोठा फायदा -
टाटा इलेक्ट्रॉनिक्सने भारतात चिप तयार करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. टेस्ला सोबतच्या करारामुळे टाटाला चिप सप्लायर म्हणून जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळेल. महत्वाचे म्हणजे, केवळ टाटाच नाही तर भारतालाही या डीलचा मोठा फायदा होणार आहे. या डीलमुळे सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनमध्ये भारताचेही नाव जोडले जाणार आहे.
काही राज्यांसोबत सुरू आहे चर्चा -
माध्यमांतील वृत्तांनुसार, टेस्ला आपल्या प्लांटसाठी गुजरात आणि महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये जमीन शोधत आहे. तसेच ते आपल्या भारतातील प्लांटवर जवळपास 2 अब्ज डॉलर एवढा खर्च करणार असल्याचा दावाही केला जात आहे.