Join us

ईएमआय पुन्हा वाढणार; व्याजदरवाढीची टांगती तलवार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 9:11 AM

नव्या आर्थिक वर्षात कर्ज महाग होऊन ईएमआय आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे़.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महागाई कमी करण्यासाठी धोरणात्मक व्याजदरात ०.२५ टक्के वाढ करण्याचा निर्णय आगामी पतधोरण आढाव्यात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून घेतला जाऊ शकतो, असा अंदाज ‘डीबीएस ग्रुप रिसर्च’ने सोमवारी व्यक्त केला. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात कर्ज महाग होऊन ईएमआय आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे़.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात गेल्या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत २.५ टक्के वाढ केली आहे. फेब्रुवारीत ०.२५ टक्के वाढीनंतर रेपो दर ६.५० टक्के झाला आहे. एप्रिलमध्ये रेपो दरात आणखी ०.२५ टक्के वाढ केली जाऊ शकते. कारण किरकोळ क्षेत्रातील महागाई अजूनही चढीच आहे. अमेरिकेतही फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता आहे. तेथेही महागाईचा दर अजूनही नियंत्रणात आलेला नाही. 

टांगती तलवार कायम

डिसेंबर २०२२ मध्ये ५.७२ टक्के असलेली किरकोळ महागाई फेब्रुवारीत ६.४४ टक्के हाेती. हा दर ४ टक्क्यांपर्यंत ठेवण्याची जबाबदारी आरबीआयवर आहे. यात २ टक्के कमी-अधिक मर्यादा आहे. मात्र, व्याजदर वाढवूनही महागाई आटाेक्यात येत नसल्यामुळे पुन्हा एकदा दरवाढीची टांगती तलवार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक